मंत्रालयात रंगली मराठी अभिवाचन स्पर्धा!


मुंबई : मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने मंत्रालयातील सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात मराठी अभिवाचनाचा कार्यक्रम चांगलाच रंगला. मराठी साहित्यातील ऐतिहासिक, विविध रसांनी परिपूर्ण अशा विविध भावभावना असलेल्या साहित्यातील उताऱ्यांचे अभिवाचन मंत्रालयीन अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवडानिमित्त या अभिवाचन स्पर्धेचे आयोजन मराठी भाषा विभागातर्फे करण्यात आले.

यावेळी मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, माहिती व जनसंपर्क सचिव तथा महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे, सहसचिव मिलींद गवादे, परिक्षक श्रीनिवास नार्वेकर, अस्मीता पांडे यावेळी उपस्थित होते.

स्पर्धकांनी यावेळी वेगवेगळया विषयावर अभिवाचन करून मराठी भाषेचे वैविध्य अभिवाचनातून मांडले. शिवाजी सावंत यांचे युगंधर, लेखिका संपदा जोगळेकर यांचे ध्यानस्थ, मंगेश पाडगावकरांचे ‘असे होते गांधीजी’ संतोष गेडाम यांचे ‘खेड्यातलं मरण’ डॉ.अपर्णा बेडेकर यांचे वैचारिक लेख, सोनचाफ्याचे झाड-एक आकलन, धनश्री लेले यांच्या सोनचाफ्याची फुले अशा विविध पुस्तकातील अभिवाचनाने स्पर्धकांनी मराठी भाषा, साहित्यावर प्रकाश टाकला.

यावेळी परिक्षक म्हणून श्रीनिवास नार्वेकर यांना काम पाहिले. श्रीनिवास नार्वेकर यांना नाट्य, एकांकिका, लेखन, दिग्दर्शन, अभिनय, पार्श्वसंगीत क्षेत्रात ११०० हून अधिक पारितोषिके मिळाली आहेत. भारतीय व अमेरिकन एजन्सीसाठी अनेक हिंदी व इंग्लिश ॲनिमेशनपटांचे लेखन केलेले आहे. यावेळी श्रीनिवास नार्वेकर व अस्मिता पांडे यांनी लेखन, अभिवाचनाबाबत स्पर्धकांना मार्गदर्शन केले.

अभिवाचन स्पर्धेसाठी प्राथमिक फेरीमधील स्पर्धकांपैकी अंतिम फेरीसाठी ११ स्पर्धकांची निवड करण्यात आली आहे. यापैकी १४ जानेवारी २०२१ रोजी सहभागी झालेल्या स्पर्धकांची अंतिम फेरीतून निवड केली जाईल. व २८ जानेवारी २०२१ रोजी म्हणजे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या शेवटच्या दिवशी बक्षीस वितरण सोहळा मंत्रालय येथे होणार आहे. यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री यांच्या हस्ते पहिले ३ बक्षिस व २ उत्तेजनार्थ बक्षीसे देण्यात येणार आहेत.