पोलिसांनी सत्य बाहेर तात्काळ आणले पाहिजे – फडणवीस


मुंबई – भाजप नेते राज्याचे सामाजिक न्याय मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरील बलात्काराच्या आरोपावरुन आक्रमक झाले असून धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी भाजप नेते करत आहेत. तर या प्रकरणावर माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही भाष्य केले असून पोलिसांनी सत्य तात्काळ समोर आणले पाहिजे असे म्हटले आहे.

स्वत: आपल्या फेसबुक पोस्टमधून काही कबुली धनंजय मुंडे यांनी दिल्यामुळे त्यांच्या पक्षाने नैतिकतेच्या आधारे त्या कबुलीच्या संदर्भातील विचार करणे गरजेचे आहे. त्यातील कायदेशीर बाबींचा विचार केला पाहिजे. एक म्हणणे त्या मुलीचे आहे, एक म्हणणे धनंजय मुंडे यांचे आहे. आपण न्यायालयात गेल्याचे धनंजय मुंडे सांगत आहेत. असे संशयाचे वातावरण राहणे योग्य नसून पोलिसांनी सत्य तात्काळ बाहेर आणले पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

भाजपने मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झाल्यानंतर आक्रमक भूमिका घेत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. किरीट सोमय्या व भाजपा महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष उमा खापरे यांच्यानंतर आता प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आपल्या चुकीच्या कृत्यांबद्दल सामाजिक न्यायमंत्री असलेल्या धनंजय मुंडे यानी तात्काळ राजीनामा द्यायला हवा. लैंगिक शोषणाचे आरोप मुंडे यांच्यावर पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही हक्क नाही.

भारतीय जनता पार्टीच्या महिला शाखेच्या वतीने एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले असून, मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी त्यामध्ये केली आहे. आता याविषयी आम्हीही आणखी जोरदार मागणी करणार आहोत. अशा प्रकारचे आरोप ज्या व्यक्तीवर होतात, त्याला या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नसतो. पण गेंड्याच्या कातडीचे हे मंत्री आणि महाविकास आघाडीचे सरकार याबाबत आत्मपरीक्षण करून मुंडेंचा राजीनामा घेतील, असे वाटतं नाही. तरीही मुंडे यांनी या पदाचा राजीनामा द्यावा, अशी आमची मागणी असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

दरम्यान राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही आरोप झाले. या प्रकरणाचा खुलासा झाला. यात काही अर्थ नसल्याचे निष्पन्न झाले. कोणीही आरोप केले म्हणजे अंतिम निष्कर्षला पोहोचणे योग्य नसून मुंडे यांच्याबाबतही चौकशी होईल, खुलासा होईल. जो खुलासा त्यांनी केला तो समोर असल्याचे जयंत पाटील म्हणाले आहेत.