मतदार यादीमध्ये घोळ ; एकाच घराच्या पत्त्यावर चक्क १०२ मतदारांची नोंदणी


नवी दिल्ली – सध्या पंचायत निवडणुकामुळे हिमाचल प्रदेशमधील राजकारण चांगलेच तापले आहे. पण त्याचवेळी मतदारयादीमध्ये गोंधळ असल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसत आहे. मतदारयादीमधून अनेकांची नावे गायब आहेत तर काही ठिकाणी अगदीच उलट चित्र दिसत आहे. असाच एक विचित्र घोळ ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्येही समोर आला आहे. यासंदर्भात काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी नाराजी व्यक्त करत मतदारयादीच्या विश्वासर्हतेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. नगर पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात त्यांनी सोशल नेटवर्किंगवर एक पोस्ट शेअर केली आहे. तसेच अग्निहोत्री यांनी निवडणुकींमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप केला आहे.
https://www.facebook.com/MukeshAgnihotriOfficial/posts/3001975746755362
फेसबुकवर मतदारयादीचा फोटो शेअऱ करत एकाच घराच्या पत्त्यावर १०२ मतदारांची ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप अग्निहोत्री यांनी केला आहे. टाहलीवाल येथील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण हे प्रवासी आहेत. याच कारणामुळे मतदारयादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप अग्निहोत्री यांनी केला आहे. यासंदर्भात स्थानिक प्रशासनाने कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही. आपल्याला या गोंधळासंदर्भात काहीच कल्पना नसल्याचे हरोलीचे उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या गौरव चौधरी यांनी म्हटले आहे. तसेच याबद्दल कोणी तक्रार केल्यास कारवाई केली जाईल, असेही चौधरी यांनी स्पष्ट केले आहे.