‘यू ट्यूबने’ही ट्रम्प यांचे चॅनेल केले तात्पुरते निलंबित


वॉशिंग्टनः गुगलच्या ‘यूट्यूब’नेही अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे चॅनेल ७ दिवसासाठी निलंबित केले आहे. त्यांच्या चॅनेलच्या माध्यमातून हिंसा भडकण्याची भीती असल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे ‘यू ट्यूब’च्या वतीने सांगण्यात आले. धोरणाचे उल्लंघन करणारा व्हिडिओही काढून टाकला आहे. गेल्या आठवड्यात ट्रम्प समर्थकांनी राजधानी परिसरात केलेल्या हिंसक आंदोलनानंतर ट्रम्प यांची अनेक समाज माध्यमातील अकाऊंटस बंद करण्यात आली आहेत.

नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांच्या कार्यक्रमात समाजमाध्यमांवरील आपल्या अकाऊंटसचा वापर करून ट्रम्प मोठ्या प्रमाणात अशांतता वाढवू शकतात, अशी भीती यू ट्यूब व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे. संभाव्य हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर आमच्या धोरणांचे उल्लंघन केल्याबद्दल ट्रम्प यांच्या चॅनेलवर अपलोड केलेली नवीन सामग्री काढून टाकली असल्याचे यूट्यूबने आपल्या निवेदनात म्हटले आहे. या चॅनेलवर किमान ७ दिवस नवीन सामग्री अपलोड करण्यास प्रतिबंधित करण्यात आले आहे.वेळ पडल्यास या चॅनेलवरील निर्बंध अनिश्चित काळासाठी वाढविण्याचा इशाराही यू ट्यूबने दिला आहे.

अमेरिकेच्या राजधानी परिसरात झालेल्या हिंसक हल्ल्यानंतर फेसबुकने ट्रम्प यांचे फेसबुक आणि इन्स्टाग्राम अकाऊंट्स गेल्या आठवड्यात बंद केली आहेत. या कारवाईबाबत फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग म्हणाले की, ट्रम्प यांनी या व्यासपीठाचा वापर हिंसक प्रवृत्तींना प्रोत्साहन देण्यासाठी केला आहे. यापुढेही ते असेच करत राहण्याची भीती आहे. ट्रम्प यांच्या स्नॅपचॅट आणि ट्विचसारख्या सेवाही निलंबित करण्यात आल्या आहेत.