महाराष्ट्राला अपेक्षेपेक्षा कमी मिळाले लसीचे डोस; राजेश टोपेंचा केंद्रावर गंभीर आरोप


मुंबई – राज्यात कोरोना लसीकरणाची जय्यत तयारी सुरु असतानाच अपेक्षेपेक्षा लसीचे कमी डोस महाराष्ट्राला मिळाल्याचा आरोप आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केला आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला पहिल्या टप्प्याच्या लसीकरणासाठी कमी डोस आले असल्याचे राजेश टोपे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे. त्याचबरोबर लसीकरण केंद्रांची संख्या केंद्राकडून करण्यात आलेल्या सुचनेनंतर कमी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

केंद्र सरकारने आपल्याला एकूण ९ लाख ७३ हजार लसीचे डोस उपलब्ध करुन दिले आहेत. बफर स्टॉकसहित बोलायचे गेल्यास १७ ते साडे सतरा डोसची आपल्याला गरज आहे. त्यापैकी नऊ ते साडे नऊ लाख आज आले आहेत. याचा अर्थ ते कमी आले आहेत. केंद्र सरकाराच्या सूचनेनुसार ज्या व्यक्तीला तुम्ही डोस देत आहात, त्या व्यक्तिला पूर्ण डोस द्या. त्यामुळे अपेक्षेच्या तुलनेच ५५ टक्के डोस आल्यामुळे आठ लाख लोकांचे लसीकरण करायचे असतानाही ५५ टक्के म्हणजेच साधारण पाच लाखांपर्यंत आम्हाला लसीकरण पूर्ण करावे लागणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

महाराष्ट्रात कोरोना लस आली असून लसीकरणास १६ जानेवारीपासून सुरुवात होत आहे. राजेश टोपेंनी याबद्दल बोलताना सांगितले की, मला समाधान असून आठ लाख लोकांना आपण अपलोड केले आहे, त्याच्या तुलनेत लस कमी आली आहे. जी लस आलेली आहे ती आज रात्रीपर्यंत किंवा उद्या पहाटेपर्यंत सर्व विभागीय कार्यालयांमध्ये पोहोचेल. त्याचसोबत अनेक जिल्ह्यांमध्ये आज रात्री तर काही जिल्ह्यांमध्ये उद्या लस पोहोचेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ जानेवारीला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपूर्ण देशभरात लसीकरणाचे उद्घाटन करतील. पंतप्रधानांशी संवाद साधण्यासाठी महाराष्ट्रात दोन ठिकाणी व्यवस्था करण्यात आली आहे. यामधील एक कूपर रुग्णालय आणि दुसरे जालन्यातील जिल्हा रुग्णालय आहे. येथून पंतप्रधानांशी संवाद साधला जाणार असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

दोन दिवसांपूर्वी ५११ केंद्रांवर मी लसीकरणाचे नियोजन केले होते. पण केंद्र सरकार आणि आरोग्य मंत्रालयाने कालच्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमध्ये एवढ्या मोठ्या स्तरावर लसीकरण करु नका,असे सांगितले. इतर जो कार्यक्रम आणि गोष्टी सुरु ठेवणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आल्यामुळे ५११ वरुन ही संख्या ३५० केली आहे. प्रत्येक लसीकरण केंद्रावर १०० अशा पद्धतीने पहिल्या दिवशी ३५ हजार जणांना लस देण्याचा आमचा मानस असल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.