‘आयपीएल’चे ‘टायमिंग’ चुकल्याने खेळाडूंच्या दुखापतीत वाढ: जस्टिन लँगर


सिडनी: कोरोना महासाथी च्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ‘आयपीएल’ क्रिकेट स्पर्धांचे ‘टायमिंग’ चुकल्याने खेळाडू मोठ्या प्रमाणात दुखापतग्रस्त होत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे प्रशिक्षक जस्टीन लँगर यांनी केला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

सध्याच्या भारत- ऑस्ट्रेलिया क्रिकेट मालिकेत दुखापतीमुळे ऑस्ट्रलिया व विशेषतः भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघातील तब्बल ९ खेळाडू दुखापतग्रस्त आहेत.

आपल्याला ‘आयपीएल’ आवडते. खेळ आणि खेळाडूंच्या विकासाला या स्पर्धेमुळे हातभारच लागला आहे.मात्र, सन २०२० मध्ये कोविडच्या पार्श्वभूमीवर संयुक्त अरब अमिरातीमध्ये सप्टेंबर ते नोव्हेंबर या कालावधीत आयोजन करण्याचा निर्णय अयोग्य होता, असे लँगर यांनी सांगितले दरवर्षी भारतात उन्हाळ्याच्या कालावधीत ‘आयपीएल’ आयोजित केली जाते.

जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा या जोडीच्या अनुपस्थितीमुळे स्पर्धेवर किती परिणाम होईल, असे विचारले असता ते म्हणाले, या खेळाडूंच्या नुपस्थितीमुळे स्पर्धेवर निश्चितच खूप मोठा परिणाम होणार आहे. अर्थात, या हंगामात ‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट,’ हेच या हंगामात सिद्ध होणार आहे, असेही ते म्हणाले. या हंगामात दुखापतींची आकडेवारी डोळे उघडणारी ठरेल. क्रिकेट संघटना आणि स्पर्धांचे आयोजक याबाबत गांभीर्याने विचार करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी एकेक सामना जिंकला असून एक कसोटी अनिर्णित ठरली आहे. त्यामुळे चौथा सामना जिंकण्याचेच दोन्ही संघांचे उद्दीष्ट असणार आहे. दुखापतीच्या समस्येमुळे भारतीय संघ स्वतःला सावरणार आहे, याबद्दल लंगर यांनी चिंता व्यक्त केली. मात्र, भारतीय संघ काय करेल यापेक्षा सामन्यांमध्ये आमचे वर्चस्व कसे राहील, यावरच आम्ही लक्ष केंद्रीत केल्याचेही त्यांनी सांगितले.