भारत शेजारी मित्रराष्ट्रांना करणार कोरोना प्रतिबंधक लसींचा पुरवठा


नवी दिल्ली: भारताकडून अनुदान कार्यक्रमांतर्गत आपत्कालीन वापरासाठी शेजारी मित्र देशांना मर्यादित प्रमाणात कोरोना प्रतिबंधक लस पाठविण्यात येणार आहेत. बाजारपेठेत विक्रीची अनुमती मिळाल्यानंतरच लसींचा व्यावसायिक पुरवठा करण्यात येईल. भारतातील लसीकरण मोहीम १६ जानेवारीला पार पडल्यानंतर मित्रराष्ट्रांना लस पाठविण्यात येईल, अशी माहिती शासकीय सूत्रांनी दिली.

सीरमच्या कोविशील्ड आणि भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन लसींचा विदेशातील देशांत पुरवठा औषध मंत्रालयाशी सल्लामसलत करून परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने करण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले आहे. लस वितरण व्यवस्थापनाबाबत पंतप्रधान आरोग्य मंत्रालयाशी संपर्कात आहेत आणि सर्व सरकारी विभाग एकमेकांशी तसेच खाजगी क्षेत्राशी सुसंगत असल्याकडे लक्ष देत आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

सध्या जगात सर्वत्र तातडीच्या वापराच्या परवानगीनेच हायझर,मॉडर्नासह सर्व लसी वितरित करण्यात येत आहेत. आणखी ३ महिन्यात सर्व लसींच्या सर्व चाचण्या पूर्ण होउन त्या बाजारपेठेत आणण्याच्या परवानग्या मिळणे अपेक्षित आहे.

केंद्र सरकार जानेवारीपर्यंत १ कोटी १० हजार लसी खरेदी करणार आहे. बांगलादेशने ३ कोटी डोसच्या व्यावसायिक पुरवठ्यासाठी सीरम इंडियाशी करार केला आहे. नेपाळ भारताकडे लसीसाठी विनंती करणार आहे. भूतान, म्यानमार आणि श्रीलंकासारख्या इतर शेजार्‍यांव्यतिरिक्त अन्य देश भारताकडून १ कोटी २० लाख डोस खरेदी करण्यास उत्सुक आहेत.