नायलॉनचा मांजा वापरल्यास थेट तुरुंगात होणार रवानगी


मुंबई – पतंगप्रेमींच्या उत्साहाला मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर उधाण आलेला असला तरी चिनी आणि नायलॉन मांजाचा वापर पतंग उडवताना करण्यांची थेट तुरुंगात रवानगी होईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे. पक्षी, प्राणी आणि नागरिकांच्या जीवाला नायलॉन मांजाचा वापर धोकादायक ठरु शकतो. म्हणूनच या मांजाच्या विक्रीवर राज्य सरकारने बंदी घातली आहे. पण, तरीही याची विक्री, वापर आणि साठवणूक छुप्या पद्धतीने केली जाते. यामुळे बंदीचे उल्लंघन करुन अशा प्रकारच्या मांजाचा वापर करण्यांना तुरुंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे.

1986 च्या पर्यावरण संरक्षण कायद्याच्या कलम 5 नुसार या मांजाच्या विक्री व वापरावर राज्य सरकारने बंदी घातली आहे. तरीही अशा मांजाची विक्री आणि वापर केला जातो. आता पोलिसांची अशांवर करडी नजर असणार आहे. कलम 188 अंतर्गत नायलॉन किंवा चिनी मांजाची विक्री आणि वापर करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. हा गुन्हा जामीनपात्र असला तरी यासाठी एक महिना तुरुंगवास किंवा दंड अथवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. तसेच कोणी या मांज्यामुळे जखमी झाल्यास इतर कलमांनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांनी सांगितले आहे.

दरम्यान, अनेक पक्षी ब्लर्ड फ्लू मुळे दगावत असल्यामुळे त्यांच्या जीवाला मांजामुळे धोका अधिक वाढू नये. तसेच मांजाच्या वापर माणसाच्याही जीवावर बेतू शकतो. त्यामुळे राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. विशेष म्हणजे महिलांच्या हळदी कुंकू समारंभासाठीही विशेष खबरदारी घेण्यात येणार आहे. महिलांचे हळदी कुंकूवाचे कार्यक्रम घरोघरी, संस्था, कार्यालयात तसेच राजकीय पक्षांच्या वतीने अनेक ठिकाणी होत असतात. अशावेळी महिला दागिने घालून घराबाहेर पडतात. अशावेळी चोरी होऊ नये म्हणून खबरदारी घेण्याचे निर्देशही सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात आले आहेत.

Loading RSS Feed