संभ्रमित शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना इतरांकडून चिथावणी: हेमा मालिनी


नवी दिल्ली: आपल्याला निश्चित काय हवे आहे, तेच शेतकऱ्यांना माहित नाही. नव्या कृषी कायद्यांमध्ये काय चुकीचे आहे, हे देखील त्यांना माहिती नाही. संभ्रमित शेतकऱ्यांना इतरांकडून चिथावणी दिली जात आहे, असा आरोप ज्येष्ठ अभिनेत्री आणि मथुराच्या खासदार हेमा मालिनी यांनी केला आहे. त्याचबरोबर तीन वादग्रस्त कायद्यांना स्थगिती देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने तणाव कमी होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंजाबमधील मोबाइल टॉवर्सची तोडफोड केल्याबद्दल हेमा मालिनी यांनी आंदोलकांवर टीका केली. मंगळवारी सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबरमध्ये संसदेत मंजूर झालेल्या केंद्राच्या कृषी कायद्याच्या अंमलबजावणीवर स्थगिती दिली. तसेच “शेतकर्‍यांच्या तक्रारी आणि सरकारचे मत जाणून घेण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे.

चर्चेच्या अनेक फेऱ्या होऊनही शेतकऱ्यांची कायद्यांबाबत सहमती होऊ शकली नाही. त्यांना काय हवे आहे हे देखील माहित नाही आणि कृषी कायद्यांमध्ये काय समस्या आहे, हे देखील यांना माहित नाही. कोणाच्या तरी चिथावणीमुळे शेतकरी आंदोलन करीत आहेत, असे हेमा मालिनी म्हणाल्या.

पंजाबमध्ये मोबाईल टॉवर्सची तोडफोड करण्याचे कृत्य अयोग्य आहे. त्यामुळे राज्यात मोठे नुकसान झाले आहे. सरकारने शेतकऱ्यांना वारंवार चर्चेसाठी पाचारण केले. मात्र, सरकारकडे काय मागायचे याचे धोरणही त्यांच्याकडे नाही, असे त्या म्हणाल्या.

रिलायन्स इंडस्ट्रीजसारख्या कंपन्या नव्या कायद्याचे अंतिम लाभार्थी ठरतील, असा आरोप शेतकरी संघटना करीत आहेत. मात्र, हेमा मालिनी म्हणाल्या की, रिलायन्सने कायदे करण्यात आपल्याला कोणताही रस नाही किंवा त्यामध्ये आपली काही भूमिकाही नाही, असे कंपनीने स्पष्ट केले आहे.