भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सिन’ही दिल्लीसह देशभरात रवाना


हैदराबाद – सीरम इस्न्टिट्यूटपाठोपाठ भारत बायोटेकची कोरोना प्रतिबंधक लस ‘कोवॅक्सिन’ आज पहाटे हैदराबाद येथून दिल्ली व इतर १० शहरांकडे रवाना करण्यात आली. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने दि. १२ रोजी लस राजधानी दिल्लीसह देशभरात लस रवाना केली आहे. शनिवारी देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचा प्रारंभ करण्यात येत आहे. भारतातील लसीकरण मोहीम जगातील सर्वात मोठी लसीकरण मोहीम असल्याचे सांगितले जात आहे.

एअर इंडियाच्या खास विमानाने लसींच्या ८० किलो ५०० ग्रॅम वजनाचे ३ बॉक्स दिल्लीला पाठविण्यात आले. दिल्लीसह बंगळुरू, चेन्नई, पाटणा, लखनौ आणि जयपूर या ठिकाणीही लसी पाठविण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

आज दिवसभरात हैदराबादस्थित लस उत्पादन प्रकल्पातून देशभरात लसींच्या १४ कन्साईनमेंट्स पाठविण्यात येणार आहेत, अशी माहिती ‘भारत बायोटेक’च्या व्यवस्थापनाने दिली.