भारताची फाळणी महात्मा गांधींच्या चुकीमुळेच झाली; भाजप नेत्याचे वक्तव्य


भोपाळ – मध्य प्रदेश विधानसभेचे प्रोटेम स्पीकर व भाजप नेते रामेश्वर शर्मा यांनी महात्मा गांधी यांच्या चुकीमुळेच देशाची फाळणी झाल्याचे वक्तव्य शेतकरी सन्मान कार्यक्रमात केले आहे. सोशल मीडियावर शर्मा यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.


रामेश्वर शर्मा हे भोपाळमधील गांधी नगर परिसरात आयोजित कार्यक्रमाला उपस्थित होते. शर्मा यांनी यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना भारताच्या फाळणीसाठी महात्मा गांधींना जबाबदार ठरवले. शर्मा म्हणाले, नावामुळे गैरसमज तयार होतात. मोहम्मद अली जिनापेक्षा जास्त धोकादायक दिग्विजय सिंह यांचे काम आणि व्यवहार आहे. देशाचे आधी जिनांनी विभाजन केले. १९४७ मध्ये बापूंकडून चूक झाली आणि देशाचे दोन तुकडे पडले. तसे विभाजन सिंह करत असल्याचे शर्मा यांनी म्हटले आहे.

यापूर्वीही अनेकवेळा रामेश्वर शर्मा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत आले होते. त्यांनी काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्यांविरुद्ध वक्तव्य केले होते. काँग्रेस दगडफेक करणाऱ्यांचे समर्थन करत असेल, तर त्यांनी समोर यावे. दगडफेकीच्या घटनांची जबाबदारी काँग्रेस घ्यायला हवी. राज्यातील सामाजिक सौहार्द खराब करण्याची परवानगी कुणालाच नसल्यामुळे सरकार कडक कायदे करण्यावर काम करत असल्याचे त्यांनी म्हटले होते.