मुंबईतील लोकलसाठी ‘चेन्नई पॅटर्न’ लागू होण्याची शक्यता


मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद असलेली मुंबईची लाईफलाईन अर्थात लोकलसेवा सर्वसामान्यांसाठी केव्हा सुरु होणार, या प्रतिक्षेत मुंबईकर आहेत. आता या सर्वांसाठी एक दिलासादायक बातमी समोर येत आहे. या आठवड्यात सर्वांसाठी लोकलसेवा सुरु करण्याबाबत घोषणा होणार असून यासाठी ‘चेन्नई पॅटर्न’चा अवलंब सरकार करणार असल्याची बोलले जात आहे. या पॅटर्ननुसार, महिलांना पूर्णवेळ आणि उर्वरीत प्रवाशांना गर्दीची वेळ वगळता प्रवास करण्याची परवानगी देण्यात येण्याची शक्यता आहे.

चेन्नई पॅटर्न म्हणजे महिलांना पूर्ण वेळ आणि पुरुषांना मर्यादीत वेळेत लोकल प्रवासाची मुभा असेल. या संदर्भातील प्रस्ताव आल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. सर्वप्रथम लोकलने प्रवास करण्याची अत्यावश्यक सेवेतील लोकांना परवानगी देण्यात आली. दुसऱ्या टप्प्यात महिलांना लोकल प्रवासाची मुभा मिळाली. आता गर्दीची वेळ टाळून सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु होण्याची दाट शक्यता आहे.

पूर्वीप्रमाणेच मुंबईतील कार्यालयांच्या वेळा आहेत. या वेळेत धावणाऱ्या लोकलची संख्या मर्यादीत असल्यामुळे प्रवाशांना लोकलसेवा मिळूनही प्रवास करण्यासाठी अडचणी निर्माण होत असल्यामुळे अधिकाऱ्यांनी यावर आक्षेप नोंदवत सर्वसामान्यांसाठी लोकल खुली करण्याचा प्रस्ताव मांडला आहे. महिलांना पूर्ण वेळ, सामान्यांना गर्दी नसलेली वेळ, सर्वांसाठी पूर्ण वेळ आणि रात्री 10 ते सकाळी 7 या काळात सामान्य प्रवाशांना हे चार पर्याय लोकल प्रवासासाठी देण्यात आले आहेत.

कोणत्या पर्यायावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शिक्कामोर्तब करतील यावर सर्वसामान्यांचा लोकल प्रवास अवलंबून आहे. त्याचबरोबर पूर्ण क्षमतेने मध्य आणि पश्चिम रेल्वेला गाड्या सुरु करण्यासाठी सज्ज राहण्याच्या सूचना देखील देण्यात आल्यामुळे सर्वसामान्यांसाठी लोकल सुरु होण्याचे संकेत दिसू लागले आहेत.