दिल्लीत जाऊन शरद पवारांची आशिष शेलारांनी घेतली भेट


नवी दिल्ली – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भाजप नेते आशिष शेलार यांनी भेट घेतली आहे. ही भेट दिल्लीमधील शरद पवारांच्या निवासस्थानी पार पडली. तत्पूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि शरद पवार यांच्यात बैठक पार पडली होती. या भेटीनंतर लगेचच शरद पवारांच्या भेटीला आशिष शेलार पोहोचले होते. आशिष शेलार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधत भेटीचे नेमके कारण सांगितले.

शरद पवारांची भेट घेत मराठा आरक्षणावर आशिष शेलार यांनी चर्चा केली. मराठा आरक्षण प्रकरणी मराठा तरुणांच्या भावना शरद पवारांना माहिती असून या भावना अतिशय तीव्र आहेत. सर्वोच्च न्यायालयात मराठा आऱक्षणाची बाजू मांडताना या विषयाचे गांभीर्यही शरद पवारांना माहिती असल्याचे आशिष शेलार यांनी भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. ते पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावरील आपली भूमिका राज्य सरकारने स्पष्ट करावी, त्याचबरोबर आरक्षणाविषयी तातडीने योग्य कायदेशीर पावले लगेच उचलावीत, याबद्दल सुद्धा शरद पवारांसोबत चर्चा केली.

नवी दिल्लीत शरद पवारांच्या निवासस्थानी मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये चर्चा झाली. अशोक चव्हाण मंगळवारी सकाळी शरद पवारांना भेटायला पोहोचले होते. विजय वडेट्टीवार आणि बाळू धानोरकर यांनीही शरद पवारांची भेट घेतली. काँग्रेसमधील प्रदेशाध्यक्ष बदलांच्या चर्चेवर शरद पवारांसोबत यावेळी चर्चा झाली.

Loading RSS Feed