विनायक मेटेंचा आरोप; मुख्यमंत्र्यांचेही आदेश अशोक चव्हाण पाळत नाहीत


मुंबई: आज पुन्हा एकदा मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी टीका केली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेशही अशोक चव्हाण हे पाळत नसल्याचा आरोप विनायक मेटे यांनी केला आहे.

आज पत्रकार परिषद घेऊन अशोक चव्हाण यांच्यावर विनायक मेटे यांनी टीका केली. येत्या 25 जानेवारी रोजी मराठा आरक्षणावर सुनावणी होणार आहे. चव्हाण यांना दिल्लीत होणाऱ्या बैठकीला याचिकाकर्ते, वकील आणि सीनियर कौन्सिल यांना घेऊन जाण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. पण मुख्यमंत्र्यांचे आदेशही चव्हाण यांनी पाळले नाहीत. पण काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनाच घेऊन चव्हाण बैठकीला गेल्याचा आरोप मेटे यांनी केला. मुख्यमंत्र्यांना आरक्षणाच्या प्रश्नांपासून चव्हाण जाणीवपूर्वक दूर ठेवत आहेत, असा दावाही त्यांनी केला.

मराठा आरक्षणाविषयीची चव्हाण यांची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. आरक्षणाची भूमिका चव्हाण हे मांडत आहेत की काँग्रेसची? याचा तपास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी करावा अशी मागणीही त्यांनी केली. आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून चव्हाण यांची हकालपट्टी करण्याच्या मागणीचाही त्यांनी पुनरुच्चार केला. आरक्षण उपसमिती सर्वांना विश्वासात घेऊन नव्याने स्थापन करण्यात यावी, अशी आमची मागणी होती. चव्हाण यांनी त्याला हरताळ फासल्याची टीकाही त्यांनी केली.