कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना राज्य सरकारने मदत करावी, फडणवीसांची मागणी


मुंबई : बर्ड फ्लूमुळे परभणी जिल्ह्यातील 800 कोंबड्या मरण पावल्यानंतर राज्यात आता खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी कोंबड्यांना मारण्याचे आदेश देण्यात आल्यानंतर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी बर्ड फ्लूचे हे संकट मोठे असून जर या साथीला थोपवायचे असेल तर वेळीच खबरदरादी घ्यावी लागेल. मोठ्या प्रमाणात कारवाई करावी लागेल, असे म्हटले आहे. तसेच, कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांचे या आजारामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सरकारला त्यांनाही मदत करावी लागले, असे मत मांडत कुक्कुटपालन करणाऱ्यांना आर्थिक सहाय्य देण्याची फडणवीसांनी मागणी केली. बर्ड फ्लूचे राज्यासमोर एक मोठे संकट असून फार मोठ्या प्रमाणात या साथीला थोपवण्यासाठी कारवाई करावी लागेल. कुक्कुटपालन करणाऱ्या व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणात मदत करावी लागेल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस भंडारा रुग्णालय दुर्घटनेबाबत बोलताना म्हणाले, या दुर्दैवी घटनेत ज्या बालकांचा मृत्यू झाला, त्यांच्या कुटुंबीयांना अद्याप कोणतीही मदत मिळाली नाही. त्याचबरोबर अजून ऑडिटही झालेले नसल्याचे म्हणत हे सरकार अतिशय टोलवाटोलवी करणारे असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. तसेच भंडारा दुर्घटनेवरुन विरोधक राजकारण करत असल्याचा आरोप शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये करण्यात आला आहे. तसेच आरोग्य सेवेच्या बाबतीत केंद्र सरकारने माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांच्याप्रमाणे काम करण्याचा सल्लाही आजच्या सामनाच्या अग्रलेखातून देण्यात आला आहे. त्यावर बोलताना या विषयावर मी काहीही बोलणार नसल्याचे म्हणत राज्यात आरोग्यमंत्री कुणाचे आहेत?, असा खोचक सवाल शिवसेनेला केला.