मुंबई – राज्यातील काही महत्वाच्या नेत्यांच्या सुरक्षेमध्ये कपात करण्यात आली आहे. तर नव्याने सुरक्षा काही जणांना पुरवण्यात आली आहे. यावरुन राज्यातील राजकीय वातावरण आता तापलेले पाहायला मिळत आहे. राज्य सरकारकडून विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, भाजप आमदार प्रसाद लाड यांच्यासह मोठ्या विरोधी पक्ष नेत्यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यायानंतर विरोधकांकडून राज्य सरकारवर टीका केली जात आहे.
वरुण सरदेसाईंना दिलेली सुरक्षा म्हणजे ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ – मनसे
दरम्यान पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई यांना एक्स दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली आहे. यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी टीका केली. राज्य सरकारची कोरोना काळातील मोहीम असलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’वरुन मुख्यमंत्र्यांना देशपांडे यांनी टोला लगावला. ‘वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे “माझे कुटुंब माझी जबाबदारी ” हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय…’ असे ट्विट देशपांडे यांनी केली आहे.
वरुण सरदेसाई यांना दिलेली सुरक्षा म्हणजे "माझे कुटुंब माझी जबाबदारी " हे वाक्य मुख्यमंत्रांनी एकदम गंभीर्यानी घेतलेले दिसतंय…
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) January 11, 2021
त्याचबरोबर राज्य सरकारच्या या निर्णयावर भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी टीका केली. ते म्हणाले, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत मोठी कपात करण्यात आली आहे. तसेच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचीही सुरक्षा कमी करण्यात आली असून सरकारचा हा निर्णय म्हणजे हे कोत्या मनोवृत्तीचे, सुडाचे राजकारण असल्याचा आरोप केशव उपाध्ये यांनी केला आहे.
राज्यातील इतर नेत्यांप्रमाणे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही सुरक्षा काढून घेण्यात आलेली आहे. मनसेच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांनी यावरुन राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधला. रुपाली पाटील सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हणाल्या, महाराष्ट्र सैनिकांची ज्यांच्याकडे एवढी सुरक्षा आहे. त्यांची झेड सुरक्षा काढून काय तीर मारणार आहे. शेवटी महविकास आघाडी पण भाजपसारखी कुचक्या मनाचीच निघाली.