महाराष्ट्रावर नवे संकट! परभणीत ८०० कोंबड्यांचा मृत्यू


परभणी – महाराष्ट्रातही देशातील इतर राज्यांपाठोपाठ ‘बर्ड फ्लू’चा संकटाने डोके वर काढले आहे. ८०० कोंबड्यांचा परभणी जिल्ह्यात मृत्यू झाला आहे. ‘बर्ड फ्लू’मुळेच या कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे प्रयोगशाळेने दिलेल्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. ही घटना मुरूंबा येथे घडली असून, याबाबतची माहिती परभणीचे जिल्हाधिकारी डी.एम. मुंगळीकर यांनी दिली आहे.

बर्ड फ्लूने देशातील सहा राज्यांमध्ये थैमान घातलेले असतानाच एकाच दिवशी परभणी जिल्ह्यातील मुरूंबा गावातील ८०० कोंबड्या मरण पावल्याची घटना घडली. ही घटना ज्या पोल्ट्री फॉर्ममध्ये घडली, तो बचत गटाच्यावतीने चालवला जातो. ८००० हजार कोंबड्या या पोल्ट्री फॉर्ममध्ये असून, त्यापैकी ८०० कोंबड्या मरण पावल्या आहेत.

कोंबड्या मरण पावल्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने नमुने भोपाळच्या प्रयोगशाळेत पाठवले होते. त्यातून बर्ड फ्लूमुळे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्ह्यात बर्ड फ्लूचा शिरकाव झाल्याचे कळाल्यानंतर जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे. मुरूंबा परिसरातील दहा किमी अंतरातील कोंबड्यांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे.

बर्ड फ्लूच्या केसेस मुरुंबा गावात आढळून आल्यामुळे जिल्हा प्रशासनाने तातडीने पावले उचलण्यास सुरूवात केली आहे. तसेच परभणीचे जिल्हाधिकारी डी. एम. मुगळीकर यांनी मुरुंबा गावातील १ किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या तसेच पाळीव पक्षी नष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय गावातील लोकांचीसुद्धा वैद्यकीय तपासणी करण्यात येणार आहे. दरम्यान, साथप्रतिबंध आणि नियंत्रणासाठी मार्गदर्शक सूचना ‘बर्ड फ्लू’ साथीचा फैलाव झालेल्या सातही राज्यांना जारी करण्यात आल्याची माहिती केंद्रीय पशूपालन मंत्रालयाने दिली.

रविवारी २६ कावळे बीड जिल्ह्य़ाच्या पाटोदा तालुक्यातील मुगगाव येथे मृतावस्थेत आढळले. भोपाळला तीन कावळ्यांचे अवशेष तर पुण्याला अन्य काही नमुने पाठवण्यात आले आहेत. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाने नगर जिल्ह्य़ातील तीन हजार ३२१ कुक्कुटपालन केंद्रांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. रविवारी मृतावस्थेत मुंबईतील चेंबूर परिसरातील टाटा कॉलनीजवळ नऊ कावळे आढळल्यामुळे रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवले. तपासणी अहवाल आल्यानंतर या कावळ्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.