बिग बींनी ‘बाबा का ढाबा’ला केली लाखोंची मदत


दिल्लीमधील ‘बाबा का ढाबा’ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. लॉकडाउनमुळे आर्थिक कंबरडे मोडलेल्या ८० वर्षीय कांता प्रसाद आणि त्यांच्या पत्नी बदामी देवी यांना मदत करण्यासंदर्भातील व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या ढाब्यावर लोकांनी गर्दी करण्यास सुरुवात केली होती. विशेष म्हणजे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचाही ‘बाबा का ढाबा’ला मदत करणाऱ्यांमध्ये सहभाग असल्याचे नुकतेच समोर आले आहे.


शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या बिग बी सुत्रसंचालन करत असलेल्या ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही शोमध्ये अभिनेत्री रवीना टंडन हॉटसीटवर होती. दरम्यान, बिग बी एका प्रश्नावर चर्चा करताना म्हणाले, सोशल मीडियावर आता कोणत्याही विषयावर लोक खुलेपणाने बोलतात आणि मदतीसाठी पुढे येतात. दिल्लीत ढाबा चालवणाऱ्या बाबांचा व्हिडीओ लॉकडाउन दरम्यान व्हायरल झाल्यानंतर त्यांना थोड्याच दिवसांत लोकांनी मदत केली, अशा प्रकारे या शोमध्ये ‘बाबा का ढाबा’वर चर्चा झाल्यानंतर या रेस्तराँला बिग बींनी देखील मदत केल्याचा खुलासा झाला.

यासंदर्भात आजतकने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्या शोमध्ये बाबा का ढाबाचा उल्लेख बिग बींनी केल्यानंतर त्यांनी ‘बाबा का ढाबा’चे कांता प्रसाद यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, एका व्यक्तीजवळ आमच्या मदतीसाठी अमिताभ बच्चन यांनी ५.५० लाख रूपये पाठवले होते. दरम्यान, मालविया नगरमध्ये ‘बाबा का ढाबा’ नावानेच नवीन रेस्तराँ कांता प्रसाद आणि त्यांची पत्नी बदामी देवी यांनी सुरु केले आहे. जिथे बाबा आता कॅश काऊंटर सांभाळतात.