भारतीय करोना लसीचे चीन कडून गुणगान

सर्व जगाला व्यापणाऱ्या करोना विषाणूवर प्रतिबंधात्मक लस उपलब्ध झाल्याने सुटकेचा निश्वास टाकला गेला असला तरी या लसींचे दुष्परिणाम समोर येऊ लागले आहेत. त्यामुळे चिंता वाढली आहे. या परिस्थितीत चीनने भारतात बनलेल्या करोना लसीचे गुणगान केले असून ही लस अधिक परिणामकारक आणि स्वस्त असल्याची अप्रत्यक्ष कबुली दिली आहे.

जगातील अनेक देशांनी करोना लसीवर संशोधन केले आहे आणि अनेक कंपन्यांनी करोना लस तयार केल्या आहेत. त्यात चीनचाही समावेश आहे. मात्र चीनी करोना लसीबाबत जगभरातून शंका व्यक्त केली जात आहे तर दुसरीकडे भारतात बनलेल्या लसीची तारीफ केली जात आहे. चीनने भारतात बनलेल्या लसीचे कौतुक करताना भारताचे थेट नाव घेतलेले नाही. मात्र शेजारी दक्षिण आशियाई देशात बनलेली करोना लस गुणवत्तापूर्ण असल्याचे म्हटले आहे.

चीन कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र ग्लोबल टाईम्सने एका लेखात चीनी लसीच्या तुलनेत भारतात बनलेली लस कुठेच कमी नाही आणि भारताची संशोधन व उत्पादन क्षमता उत्तम असल्याचे म्हटले आहे. भारत कोविड लस निर्यात करण्याची योजना आखत आहे यामुळे जागतिक बाजारासाठी ही चांगली बातमी असल्याचे यात म्हटले गेले आहे. मात्र यामागे चीनी लसीच्या स्पर्धेत भारत त्यांचे जागतिक आणि राजनितीक व आर्थिक वर्चस्व वाढविण्याचा उद्देश बाळगून आहे असा दावा केला गेला आहे.

भारत हा जगातील सर्वात मोठा लस उत्पादक देश आहे. कमी मजुरी आणि चांगल्या सुविधा यामुळे भारतात बनलेल्या लसी स्वस्त किमतीत मिळू शकतात. जगात उत्पादित होत असलेल्या एकूण लसीपैकी ६० टक्के उत्पादन भारतात होते असेही समजते.