चाळीशीतही दिसा विशीचे..आजमावा हे उपाय


आपण कोणत्याही वयामध्ये सुंदरच दिसावे अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. वाढत्या वयाच्या खुणा शरीरावर आणि चेहऱ्यावर दिसू नयेत यासाठी अनेक तऱ्हेची प्रसाधने, ब्युटी ट्रीटमेंटस् यांचा ही वापर आजकाल सर्रास होताना आपण पाहत आहोत. ही प्रसाधने किंवा ब्युटी ट्रीटमेंट वापरल्याने चेहेरा काही काळ तरुण, सुंदर दिसतोही, पण तारुण्य टिकून ठेवण्यासाठी या प्रसाधनांचा वापर सातत्याने सुरु ठेवावा लागतो. कितीही नाही म्हटले तरी प्रसाधानांमध्ये थोड्याफार प्रमाणामध्ये रासायनिक पदार्थ असतातच. अतिवापरामुळे या पदार्थांचे दुष्परिणाम चेहऱ्यावर दिसून येण्याचा धोकाही असतोच. त्यामुळे प्रसाधनांचा वापर करताना काळजी घेणे आवश्यक ठरते.

चेहऱ्याचे तारुण्य टिकवून ठेवण्यासाठी अनेक साधे सोपे घरगुती उपायही आहेत. यामध्ये वापरल्या जाणाऱ्या वस्तू पूर्णपणे नैसर्गिक असून, त्यांच्यामुळे चेहरा उजळण्यास मदत होते. तसेच त्वचेवरील मुरुमे-पुटकुळ्या दूर होतात. उन्हामुळे चेहऱ्यावर आल्याला काळसरपणा ही या उपायामुळे कमी होतो. हा उपाय करण्यासाठी हळद आणि लिंबू यांचा वापर करावयाचा आहे. ज्यांची त्वचा तेलकट असेल, त्यांना लिंबाच्या रसाने विशेष फायदा होतो. लिंबू अॅसिडिक असल्याने त्वचेतील तेलकटपणा कमी करण्यास मदत करतो. मात्र ज्यांची त्वचा कोरडी आहे, त्यांनी लिंबू न वापरता दह्याचा वापर करणे जास्त चांगले. लिंबाच्या रसाने त्वचेचा पोत सुधारण्यास मदत होऊन त्वचा उजळते.

या उपायासाठी काही थेंब लिंबाचा रस आणि अर्धा लहान चमचा हळद वापरावी. हे दोन्ही पदार्थ एकत्र करून, आवश्यकतेनुसार पाणी घालून याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट संपूर्ण चेहऱ्यावर लावून दहा ते पंधरा मिनिटे ठेवावी. त्यांनतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुवावा. या पेस्ट च्या वापरामुळे त्वचा नितळ, मुलायम होण्यास मदत होते. चेहऱ्यावर हलके काळसर डाग किंवा ब्लॅक हेड्स असल्यास ते ही या उपायामुळे दूर होतात. चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील या उपायामुळे कमी होतात. परिणामी त्वचा तरुण दिसू लागते.

Leave a Comment