भारतीय खेळाडूंवर वर्णद्वेषी शेरेबाजी: सामानाधिकाऱ्यांकडे तक्रार


सिडनी: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसर्‍या व तिसर्‍या दिवसाच्या खेळादरम्यान भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांच्यावर प्रेक्षकांकडून वर्णद्वेषी शेरेबाजी करण्यात आली. याबाबत ‘टीम इंडिया’ने सामानाधिकाऱ्यांकडे अधिकृत तक्रार दाखल केली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) या प्रकरणाची दखल घेतल्याचेही समजते.

वर्णद्वेषी शेरेबाजीच्या प्रकारामुळे या दौऱ्याला निश्चितपणे गालबोट लागले आहे. सुसंस्कृत समाजात वनद्वेषी शेरेबाजीला अजिबात स्थान नाही. ‘आयसीसी’ आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियालाने अतिशय संवेदनशील राहून या प्रकरणाची गंभीर दखल घेणे आवश्यक आहे, असे मत भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाच्या (बीसीसीआय) अधिकाऱ्याने व्यक्त केले आहे.

सध्याच्या कोरोना संकटाच्या काळात क्रिकेटवर मोठ्या प्रमाणावर मर्यादा आल्या आहेत. अशा अवस्थेतही खेळल्या जाणाऱ्या सामन्यांना अशा प्रकारांनी गालबोट लागणे अयोग्य आहे. विशेषतः सहभागी खेळाडूंच्या मनोबलावर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो. आम्ही भारतीय खेळाडूंच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत. कोणत्याही परिस्थितीत वर्णद्वेष सहन केला जाणार नाही, असा इशाराही या अधिकाऱ्याने दिला आहे.