मानवतेच्या रक्षणासाठी भारत सज्ज: पंतप्रधान


नवी दिल्ली: जो भारत एकेकाळी वैद्यकीय उपकरणे आणि साधनसामुग्रीसाठी आयातीवर अवलंबून होता; त्याचा भारताने विकसित केलेल्या कोरोनाप्रतिबंधक दोन लसी मानवतेचे रक्षण करण्यासाठी आज सज्ज आहेत. भारताच्या परिवर्तनाचे हे द्योतक आहे, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

प्रवासी भारतीय दिवसाच्या १६ अधिवेशनाचे उदघाटन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मोदी यांनी देशात विविध क्षेत्रांमध्ये झालेल्या नेत्रदीपक कामगिरीचा उल्लेख केला.

भारत पीपीई किट्स, मास्क, व्हेंटिलेटर आणि चाचणीची साधने विदेशातून आयात आयात करीत असे. मात्र, आज आपले राष्ट्र स्वावलंबी आहे. आज भारत मानवतेला वाचविण्यासाठी स्वतः विकसित केलेल्या दोन लसी घेऊन सज्ज आहे, असे ते म्हणाले.

पंतप्रधानांनी देशातील गरिबांना सक्षम बनविण्यासाठी मोहीम सुरू केली. आज ती जागतिक स्तरावर पोहोचली आहे, असे पंतप्रधानांनी नमूद केले.
भारत जेव्हा जेव्हा दहशतवादाच्या सामना करत होता, त्या लढ्याने जगालाही दहशतवादाच्या आव्हानाला तोंड देण्याचे सामोरे जाण्याचे धैर्य प्राप्त झाले. आज भारत भ्रष्टाचार संपवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे. कोट्यवधी रुपयांचे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा केले जात आहे. असे पंतप्रधान म्हणाले.

कोरोना संकटाच्या गेल्या वर्षभरातील दगदगीत भारताबाहेरील भारतीय समुदायाच्या भूमिकेबद्दल आणि त्यांनी जगाला सुरक्षित ठेवण्यासाठी कर्तव्य चोखपणे बजावल्याबद्दल पंतप्रधानांनी कौतुक केले. इतरांच्या हिताचा विचार ही आपली परंपरा आहे. आपल्या मातीची संस्कृती आहे. सामाजिक आणि राजकीय नेतृत्वाच्या बाबतीत जगाचा भारतीयांवर विश्वास दृढ होत आहे, असा दावा पंतप्रधान मोदी यांनी केला.