नवी दिल्ली: भारताचे माहिती तंत्रज्ञानाचे केंद्र बंगळुरू आणि अमेरिकेतील सिलिकॉन व्हॅली वसलेले सॅन फ्रान्सिस्को यांच्यात एअर इंडियाची पहिली विना थांबा सेवा आजपासून सुरू होत आहे. या विमानांच्या चालकांपासून सर्व कर्मचारीवृंद महिलांचा असणार आहे. या विमान सेवेचे पहिले उड्डाण सॅन फ्रान्सिस्को येथून आज (९ जानेवारी) स्थानिक वेळेनुसार रात्री सडे आठ ८ वाजता निघून ११ जानेवारी रोजी पावणेचार वाजता बंगळुरूला पोहोचेल.
एअर इंडियाच्या सर्वात मोठ्या विमानफेरीचे संचालन महिलांच्या हाती
कॅप्टन झोया अग्रवाल या अनुभवी आणि कुशल वैमानिक असून त्यांनी ८ हजार तासांहून अधिक काळ उड्डाण केले आहे. त्या १० वर्षाहून वर्षाहून अधिक काळ ‘बी -७७७’ विमान चालवित आहेत. त्या या विमानाच्या पहिल्या फेरीचे नेतृत्व करतील तर कॅप्टन पापागरी थनमाई (पी 1), कॅप्टन आकांशा सोनवरे (पी 2) आणि कॅप्टन शिवानी मन्हास (पी 2) या महिला ‘कॉकपिट क्रू’मध्ये सहभागी असतील
या बोईंग ७७७- २०० विमानामध्ये ८ फर्स्ट क्लास, ३५ बिझिनेस क्लास, १९५ इकॉनॉमी क्लास यांच्यासह कॉकपिट आणि १२ केबिन क्रू अशा २८८ जणांची आसनक्षमता असणार आहे. बंगळुरू आणि सॅन फ्रान्सिस्को दरम्यानचे हवाई अंतर अंदाजे १३ हजार ९९३ किमी आहे. अंदाजे साडेतेरा तासांच्या प्रवासात टाइम झोनमध्ये बदल करून जगाच्या दोन टोकांवरील ही शहरे थेट विमानसेवेने जोडली जाणार आहेत. या फेरीचा एकूण प्रवासाचा वेळ १७ तासांचा असणार आहे. .
एअर इंडिया किंवा भारतातील इतर कोणत्याही विमान कंपनीमार्फत चालविण्यात येणारे हे जगातील सर्वात लांब पल्ल्याचे हे व्यावसायिक उड्डाण असणार आहे. या उड्डाणांसाठी नेहेमीच महिला अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यासाठी ‘एअर इंडिया’ नियोजन करीत आहे. ‘एअर इंडिया’मध्ये जगातील इतर एअरलाईन्सपेक्षा महिला कर्मचार्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे. ‘एअर इंडिया’च्या उड्डाण सुरक्षा विभागाच्या कार्यकारी संचालक कॅप्टन निवेदिता भसीनसुद्धा या विमानाने पहिल्या फेरीत प्रवास करणार आहेत.