शेतकरी आंदोलनाबाबत सोनिया गांधी करणार पक्षातील नेत्यांशी चर्चा


नवी दिल्ली: आंदोलनकर्ते शेतकरी आणि सरकार यांच्यात आठव्या फेरीतील चर्चाही निष्फळ ठरल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आज पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी आंदोलनाविषयी चर्चा करतील. या बैठकीत पक्षाचे सर्व सरचिटणीस आणि प्रभारी यांच्याशी चर्चा करून कृषिकायद्यांच्या निषेधार्थ शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर सुरू केलेल्या आंदोलनाला बळ देण्यासाठी काय करता येईल, यासंबंधी विचार करणार आहेत. .

काँग्रेसने या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. गांधी यांनी यापूर्वी नरेंद्र मोदी हा ‘सर्वात अहंकारी’ सत्ताधारी असल्याची टीका केली आहे. नवीन कायदे मागे घेत आपला ‘राजधर्म’ पाळण्याची मागणीही त्यांनी केली होती.

शेतकरी आंदोलनावरून कॉंग्रेस आता मोदी सरकारच्या विरोधात आक्रमक होण्याच्या तयारीत असल्याचे वृत्तसंस्थेने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे. कॉंग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा म्हणाले की, नवीन ३ कृषी कायद्यांमधील छोटेसे तुकडे रद्द करण्यात काहीच अर्थ नाहीत. हे कायदे संपूर्णपणे रद्द झाले पाहिजेत, अशी मागणी त्यांनी केली.