प्रियांकावर कोविड नियमांच्या उल्लंघनाचा आरोप: प्रियांकाचा इन्कार


लंडन: विख्यात अभिनेत्री प्रियंका चोप्रा यांच्यावर कोविड लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला. प्रियांका यांनी मात्र, या आरोपाचा इन्कार केला आहे. ब्रिटनमध्ये सलून लॉकडाऊनच्या नियमांनुसार बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. कोणत्याही प्रकारच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मालकास १० हजार डॉलर दंड होऊ शकतो.

ब्रिटिश माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, ‘टेक्स्ट फॉर यू’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी प्रियांका लंडन येथे आल्या आहेत. त्या आपल्या आई मधु चोप्राबरोबर नॉटिंग हिलमधील ‘वुड कलर सलोन’मध्ये आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिस अधिकारी सलूनमध्ये पोहोचले आणि मालकाला समाज दिली. मात्र, त्यांच्यावर कोणताही दंड लावण्यात आला नाही.

या प्रकाराबाबत प्रियांकाच्या प्रवक्त्याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रियंका चित्रपटाच्या संदर्भात सलूनमध्ये आल्या होत्या. सरकारच्या परवानगीनेच सलून केवळ चित्रपटाच्या कामासाठी उघडण्यात आले होते. त्या ठिकाणी आलेल्या सर्वांची तपासणी करण्यात आली. तसेच त्या ठिकाणी सर्व खबरदारीच्या उपायांवर अंमलबजावणी करण्यात आली, असे निवेदनात म्हटले आहे.

प्रवक्त्याने सांगितले की, ब्रिटनमध्ये चित्रपट आणि दूरदर्शन कार्यक्रमांच्या निर्मितीस परवानगी आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार कोणत्याही ठिकाणी शूटिंग करता येते. सलूनमध्ये जाण्यासाठी मिळालेले परवानगीचे पत्र पोलिसांना दाखविण्यात आले, त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले, असा दावाही त्याने केला.