स्थलांतरितांवरील निर्बंधांबाबत अमेरिकेबरोबर चर्चा: अनुराग श्रीवास्तव


नवी दिल्ली: अमेरिकेने एच १ बी व्हिसावर अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांची संख्या कमी करण्यासाठी लादलेले निर्बंध शिथिल करण्याच्या दृष्टीने भारत अमेरिकेबरोबर चर्चा करत असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. ट्रम्प प्रशासनाने मागील महिन्यात निर्बंधात वाढ केली आहे.

व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना बोलताना परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, अमेरिकेत काही स्थलांतरितांच्या प्रवेशावरील निर्बंध तीन महिन्यांनी वाढविण्याच्या प्रशासनाच्या निर्णयाची दाखल परराष्ट्र मंत्रालयाने घेतली आहे. याचा त्रास अमेरिकेतील भारतीयांना होऊ नये, यासाठी परराष्ट्र विभाग प्रयत्न करीत आहे, असेही ते म्हणाले.

भारतीय आणि अमेरिकन नागरिकांमधील परस्पर व्यक्तिगत संबंधांचा हे भारत आणि अमेरिका यांच्यातील भागीदारीत महत्त्वपूर्ण वाटा आहे. अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी भारतीय कुशल कर्मचारी आणि व्यावसायिकांनी योगदान दिले आह, असे श्रीवास्तव यांनी सांगितले.

एच १ बी व्हिसाद्वारे विदेशी नागरिकांना अमेरिकेत नोकरी करण्याची संधी मिळते. विशेषतः कुशल कर्मचारी आणि व्यावसायिक यांना या व्हिसाद्वारे अमेरिकेत काम करता येते. कोरोनाच्या काळात स्थलांतरितांच्या संख्येवर आळा घालण्यासाठी या व्हिसाची संख्या कमी करण्यात आली आहे. त्यामुळे भारतातून अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्यांची अडचण होत आहे.