चीनला पुन्हा करोनाचा विळखा

फोटो साभार नई दुनिया

चीन पासून सुरु होऊन जगभर भ्रमण केलेल्या करोनाने पुन्हा एकदा चीनला विळखा घातला आहे. गेल्या पाच महिन्यात चीन मध्ये करोनाचा प्रसार वेगाने होत असुन या काळात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. गेल्या पाच महिन्यात प्रथमच एका दिवसात सर्वाधिक करोना संक्रमित सापडले आहेत यामुळे बीजिंग जवळील हेबेई प्रांतात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला गेला आहे. चीन मधील करोना संक्रमित संख्या ८७२७८ वर गेल्याचे आणि मृतांचा आकडा ४६३४ वर गेल्याचे जाहीर केले गेले आहे. चीनच्या गोंगडोंग मध्ये द. आफ्रिकेतील करोना विषाणूचा स्ट्रेन सापडला असल्याचे समजते.

जपान मध्येही करोना वेगाने पसरत आहे. यामुळे टोकियो आणि आसपासच्या भागात आणीबाणी पुकारली गेली आहे. जपान मध्ये गेल्या चोवीस तासात ६०७६ नवे संक्रमित सापडले आहेत. ब्रिटन मध्ये गेल्या २४ तासात ११६२ मृत्यू झाले असून एप्रिलनंतर मृतांची ही संख्या सर्वाधिक असल्याचे समजते. येथेही तिसऱ्यांदा लॉकडाऊन लावला गेला आहे. युरोपच्या २२ देशात ब्रिटन मध्ये सापडलेल्या नव्या करोनाचा प्रसार झाला आहे. करोनामुळे सर्वाधिक प्रभावित देशांच्या यादीत अमेरिका प्रथम क्रमांकावर असून येथे २२,१३२,०४५ संक्रमित रुग्ण आहेत आणि सुमारे पावणे चार लाख मृत्यू झाले आहेत. अमेरिकेत लहान मुलांमध्ये करोना संसर्ग होण्याचे प्रमाण वेगाने वाढले असून हे प्रमाण १७ टक्क्याने वाढले आहे. अमेरिकेत २० लाख लहान मुले करोना संक्रमित आहेत.