‘देशद्रोही असाल तर पाठींबा; राष्ट्रप्रेमी असाल तर हेळसांड:’ कंगना
मुंबई: ट्विटरवरील टिप्पणीबाबत करण्यात आलेल्या तक्रारीवरून अभिनेत्री कंगना राणावत आणि तिची बहीण रंगोली चंदेल यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल झाल्यानंतर कंगनाने एक ट्विट केले आहे. तुम्ही जर देशद्रोही असला तर तुम्हाला मोठा पाठींबा मिळेल आणि देशभक्त असाल तर हेळसांड केली जाईल, असे तिने या ट्विटमध्ये नमूद केले आहे.
शुक्रवारी कंगना आणि रंगोली यांचा वांद्रे पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यात आला. त्यांची सुमारे २ तास चौकशी झाली. चौकशी पूर्ण झाल्यानंतर कंगनाने हे ट्विट केले आहे. सध्या देशद्रोह्यांना भरपूर पाठींबा, संधी मिळेल. कौतूक होईल,पुरस्कार मिळतील. मात्र, तुम्ही देशप्रेमी असाल तर एकटे पडाल. स्वतःच स्वतःला सांभाळावे लागेल, अशा अर्थाचे ट्विट तिने केले आहे.
पोलीस ठाण्यात जाण्यापूर्वीही कंगनाने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ प्रसिद्ध केला.मी देशासाठी, देशवासीयांच्या बाजूने उभी राहिले. आता माझे मानसिक, भावनिक व शारीरिक शोषण होत आहे. हे का होत आहे? या सावळाचे उत्तर मला हवे आहे. आता देशवासीयांनी माझ्यासाठी उभे रहावे, अशी अपेक्षाही तिने व्यक्त केली आहे.
समाजमाध्यमातील टिप्पण्यांबद्दल साहिल नामक व्यक्तीने केलेल्या तक्रारीवरून कंगना आणि रंगोली यांच्यावर देशद्रोह, सामाजिक तेढ उत्पन्न करणे आणि जातीय भावना भडकावणे अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.