बहुप्रतिक्षित ‘केजीएफ 2’चा टीझर तुमच्या भेटीला


‘केजीएफ’ या चित्रपटाच्या पहिल्या भागाला मिळालेली लोकप्रियता पाहता प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबतही उत्सुकता आणि कुतूहल कायम असल्याचे चित्र पाहायला मिळाले आणि अखेर या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाचा टीझर याच उत्साही वातावरणात प्रेक्षकांच्या भेटीला आला. अभिनेता यश याच्या वाढदिवसाआधीच टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला. चित्रपटासाठीची चाहत्यांमध्ये असणारी उत्सुकता पाहता हा निर्णय़ घेतल्याचे सांगितले जात आहे. टीझर प्रदर्शित होताच सोशल मीडियावर तो काही मिनिटातच ट्रेंडमध्ये आला.

हा टीझर होमबेल युट्यूब चॅनलवर रिलीज करण्यात आला. ज्यामध्ये ‘रॉकी’ आणि त्याच्या आईचे नाते आणि गतकाळातील काही दृश्य पाहायला मिळत आहेत. रॉकीचे त्याच्या आईने कशा प्रकारे संगोपन केले, त्याची कशी काळजी घेतली, तो कशा पद्धतीने मोठा झाला आणि आता आपण दिलेले वचन तो पूर्ण करत असल्याची झलक काही मिनिटांच्या टीझरमध्ये पाहायला मिळत आहे.

या चित्रपटामध्ये अभिनेत्री रवीना टंडन एक राजकीय व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. तर, संजय दत्तने साकारलेल्या ‘अधीरा’च्या लूकवरुन अद्यापही पडदा उचलण्यात आलेला नाही. यामध्ये अभिनेता यश धमाकेदार अॅक्शन करताना दिसत आहे. या टीझरमध्ये साहसदृश्य., भावभावना आणि प्रभावी संवाद यांचा मिलाप पाहायला मिळत आहे. यशचा एकंदर लूक आणि अंदाज पाहता चाहते त्याच्यावर खऱ्या अर्थाने भाळले आहेत. तेव्हा या चित्रपटाला आता प्रेक्षक किती पसंती देतात आणि पहिल्या भागाने रचलेले विक्रम तो मोडित काढतो का, हे चित्रपट रिलीज झाल्यानंतरच कळेल.