मुंबई शहर जिल्ह्यात मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन


मुंबई : राज्यात १४ ते २८ जानेवारीदरम्यान मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात येणार आहे. मराठी भाषा संदर्भातील विविध उपक्रम राज्यभर राबविले जाणार आहेत. त्यानुसार मुंबई शहर जिल्ह्यातही विविध उपक्रमांचे आयोजन करण्याचे निर्देश संबंधित विभागांना जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिले.

या संदर्भात बैठकीचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सदानंद जाधव, उप जिल्हा निवडणूक अधिकारी माधव पाटील उपस्थित होते. यावेळी जिल्हा ग्रंथालय, एशियाटिक लायब्ररी,साहित्य संघ, मुंबई तसेच एसएनडीटी विद्यापीठ मराठी विभाग, राष्ट्रीय सेवा योजना, महानगरपालिका शिक्षण विभाग आदींच्या माध्यमातून या संदर्भाच्या शासन निर्णयातील निर्देशाप्रमाणे विविध उपक्रमांचे आयोजन करण्याबाबत प्राथमिक चर्चा झाली.

ग्रंथप्रदर्शन, ऑनलाईन व्याख्याने, स्पर्धा, या क्षेत्रातील मान्यवर व नामवंतांचा सत्कार, ई बुक अशा उपक्रमांचे आयोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या. त्याचबरोबर एशियाटिक सोसायटीच्या श्रीमती बलापोरिया, जिल्हा ग्रंथालय अधिकारी शशिकांत काकड, साहित्य संघाचे सुभाष भागवत, शासकीय मुद्रणालयाचे सहायक व्यवस्थापक सचिन केदार व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.