भारतात लवकरच कोरोना प्रतिबंधक लसीकरण: डॉ. हर्ष वर्धन


चेन्नई :येत्या काही दिवसात भारतात नागरिकांसाठी कोरोना प्रतिबंधक लस उपलब्ध करून देण्यात येईल, अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी केली. लसीकरण कार्यक्रमाची संपूर्ण माहिती राष्ट्रीय पातळीपासून तळागाळातील लोकांपर्यंत पोचविली जात असल्याचे ते म्हणाले.

कोरोना प्रतिबंधक लस आरोग्य क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी काम करणाऱ्यांना प्रथम देण्यात येणार असल्याचे डॉ. हर्ष वर्धन यांनी स्पष्ट केले.

अल्पावधीतच लस विकसीत करून भारताने चांगले काम केले आहे. येत्या काही दिवसांत आपण आपल्या देशवासियांना या लसी उपलब्ध करून देणार आहोत.. मोठ्या प्रमाणात लसीकरण कार्यक्रम राबविण्यासाठी लाखो आरोग्य कर्मचार्‍यांना ‘ड्राय रन’च्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जात आहे, असेही त्यांनी सांगितले.

ड्राय रन कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी डॉ. हर्ष वर्धन तामिळनाडूच्या दौऱ्यावर आहेत. शहर व परिसरातील विविध रुग्णालयांना ते भेट देणार आहेत. देशभरात ३३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांतील ७३६ जिल्ह्यात दुसरा ‘ड्राय रन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. ‘ड्राय रन’च्या माध्यमातून देशभरात कोरोना प्रतिबंधक लसीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी यंत्रणा उभारण्यात येत आहे.