6 लाखांनी कमी होऊ शकतात मुंबईमधील घरांच्या किंमती


मुंबई – राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये काही दिवसांपूर्वी सरकारने बांधकाम व्यवसायिकांना प्रीमियम मध्ये 50% सवलत देण्याचा निर्णय घेतला होता. ज्यामुळे मुंबईत घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न आता आवाक्यात येण्याचे चित्र सध्या दिसत आहे. या नव्या निर्णयामुळे मुंबईतील घरांची किंमत 6 लाखांनी कमी होऊ शकते. राज्य सरकारच्या या सवलतीचा लाभ जे गृहनिर्माण प्रकल्प घेणार आहेत ते पूर्ण मुद्रांक शुल्क आपल्या ग्राहकांच्या वतीने भरणार असल्यामुळे ग्राहकांवरील आर्थिक भार थोडा कमी होणार असून घर खरेदी वाढेल अशी शक्यता आहे.

सुरूवातीला नोटबंदी आणि नंतर कोरोनाच्या संकटामुळे घर खरेदी-विक्रीचे व्यवहार कोलमडले होते. स्थिती आता हळूहळू पूर्वपदावर येत असताना राज्याची आर्थिक घडी बसवण्याचे काम करताना राज्य सरकारने एक मोठा दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. पालिकेच्या हद्दीमध्ये 3500 ते 5000 फ्लॅट्सच्या सोसायटीमध्ये प्रिमियम शुल्क 500 कोटी पर्यंत असते. हा खर्च प्रत्येक फ्लॅटमागे अंदाजे 12.50 लाख असतो. त्यामध्ये जर 50 % सूट मिळाली, तर तो 6.25 लाखांपर्यंत असेल. परिणामी घराच्या किंमती 6 लाखांनी कमी होऊ शकतात असा अंदाज आहे.

6439 घरांची गेल्या तीन महिन्यात खरेदी करण्यात आली आहे. एकूण महसूलात 45 टक्के वाटा हा घर खरेदीचा आहे. सायन ते कुलाबा भागात मालमत्ता खरेदी सर्वाधिक झाली आहे. आता बांधकाम प्रकल्पांना सर्व प्रीमियमवर (अधिमूल्य) 31 डिसेंबर 2021 पर्यंत 50 टक्के सूट आहे.