पिंपरी- चिंचवडमध्ये आढळले कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 रुग्ण


पुणे – ब्रिटनमध्ये आढळलेल्या कोरोनाच्या नव्या स्ट्रेनचे आणखी 3 पॉझिटीव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळून आल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीच ट्विट करत दिली. पिंपरी – चिंचवडचे हे तिन्ही प्रवासी रुग्ण असल्याची माहितीही त्यांनी दिल्यामुळे आता पिंपरी- चिंचवड भागात दहशतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. राज्यात आणखी 3 रुग्ण ब्रिटनमधील नवीन कोरोना स्ट्रेनचे आढळले. तिनही प्रवाशी पिंपरी चिंचवडचे असून नव्या कोरोना स्ट्रेनचे राज्यात आता एकूण 11 प्रवाशी झाले असल्याची माहिती टोपे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.


दरम्यान राज्यात आतापर्यंत ब्रिटनमधील कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची लागण झालेल्यांची रुग्णसंख्या 11वर पोहोचली असतानाच त्यातील 2 रुग्णांना रुग्णालयातून रजा देण्यात आली आहे. यामध्ये मुंबई आणि पुण्यातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार नव्या स्ट्रेनच्या कोरोनाचा संसर्ग झालेले 11 रुग्ण हे असिम्प्टमॅटिक आहेत. अर्थात या रुग्णंमध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आलेली नाहीत.

आतापर्यंत महाराष्ट्रात आंतरराष्ट्रीय प्रवास करुन आलेल्या जवळपास 4,858 प्रवाशांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाच्या नव्या स्ट्रेनची दहशत पसरलेली असतानाच सावधगिरी म्हणून राज्यात हे पाऊल उचलण्यात आले आहे. या प्रवाशांपैकी 1,211 जणांना आतापर्यंत त्यांनी अत्यावश्यक अशा संस्थात्मक विलगीकरणाचा कालावधी पूर्ण केला आहे.