समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी २४.४३ कोटी रुपये वर्ग


मुंबई : राज्यातील सर्व विभागातील ५१ समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मिळून १२६७ कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री श्री.धनंजय मुंडे यांनी विशेष लक्ष घालून सोडविला आहे. या सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यासाठी २४.४३ कोटी रुपये निधी मंजूर करून समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्तांकडे वर्ग करण्यात आला आहे.

राज्यभरात विभागनिहाय मुंबई, पुणे, औरंगाबाद, लातूर, नागपूर, नाशिक, अमरावती अशा ७ विभागांमध्ये कमी अधिक मिळून ५१ समाजकार्य महाविद्यालये आहेत यामध्ये सर्वाधिक २० महाविद्यालये नागपूर विभागात आहेत. समाज कार्य महाविद्यालयांचे सहाय्यक अनुदान या लेखाशीर्ष अंतर्गत आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ८०% उद्दिष्टपूर्ती साध्य केली आहे.

या लेखाशीर्ष अंतर्गत १२९.५० कोटी इतकी आर्थिक तरतूद असून आज प्राप्त झालेल्या २४.४३ कोटींसह विभागाने या लेखाशीर्षावर आजपर्यंत १०३.३६ कोटी रुपये उपलब्ध करून दिले असून ही रक्कम या लेखाशीर्षाच्या उद्दिष्टाच्या ८०% इतकी आहे. यामध्ये नागपूर विभागास सर्वाधिक १५.९८ कोटी, नाशिक – १२.५० कोटी, अमरावती – ७.२० कोटी अशी रक्कम वर्गीकरण करण्यात आली असून अन्य विभागातील वेतनप्रश्नी या अगोदरच तरतूद करण्यात आली असल्याचे समाज कल्याण सहआयुक्त भारत केंद्रे यांनी म्हटले आहे.

दरम्यान समाजकार्य महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा वेतनाचा प्रश्न नवीन वर्षाच्या पहिल्याच आठवड्यात सोडविण्यात आल्यामुळे आता या सर्व १२६७ शिक्षक-कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.