अमेरिकन राजधानीत ट्रम्प समर्थकांचा धिंगाणा: एक जण ठार


वॉशिंग्टन: अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीत झालेला पराभव अमान्य केल्यानंतर राजधानी परिसरात जमलेल्या ट्रम्प समर्थकांनी अक्षरश: धिंगाणा घातला. यावेळी ट्रम्प समर्थक आणि पोलीस यांच्यात झटपट झाली. यावेळी एका व्यक्तीचा पिस्तुलाची गोळी लागून मृत्यूही झाला. या घटनेनंतर राजधानी परिसरात टाळेबंदी लागू करण्यात आली असून या परिसरातील व्यक्तींना बाहेर जाण्यास अथवा बाहेरील व्यक्तीला आत येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

अध्यक्षीय निवडणुकीत आगामी अध्यक्ष जो बिडेन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्यासाठी अमेरिकन संसदेची बैठक सुरु होण्यापूर्वी ट्रम्प यांनी आपल्या हजारो समर्थकांसमोर सुमारे तासभर भाषण केले. या भाषणात त्यांनी आपला पराभव झाल्याचे नाकारले. वास्तविक या निवडणुकीत आपला शानदार विजय झाला आहे. मात्र, आपले प्रतिस्पर्धी बिडेन यांच्यासाठी या निवडणुकीत घोटाळा करण्यात आल्याचा आरोप ट्रम्प यांनी केला. अशा अफ़रातफ़रीच्या निवडणुकीत आपला पराभव झाल्याचे मान्य करणे अयोग्य ठरेल, असे ते म्हणाले.

अध्यक्षीय निवडणुकीत बिडेन यांच्या विजयाच्या औपचारिकतेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या अमेरिकन कॉंग्रेसच्या संयुक्त अधिवेशनाला पेस यांच्या अध्यक्षतेखाली सुरुवात होताच रिपब्लिकन सदस्यांच्या गटाने निवडणुकीच्या निकालाला आव्हान देण्याचा प्रयत्न केला. विशेषतः अ‍ॅरिझोनाच्या बिडेन यांच्या विजयावर त्यांचा आक्षेप होता. ट्रम्प यांचा मोठा दबाव असतानाही उपाध्यक्ष माईक पेंस यांनी ट्रम्प यांची निवडणुकीचा निकाल फिरवण्याची मागणी नाकारली. निवडणूक निकालाच्या खरेपणाबद्दल आपणही अनेकदा शंका व्यक्त केली आहे. मात्र, जनमत स्वीकारण्याचा किंवा नाकारण्याचा अधिकार आपल्याला नाही, असे त्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले.

त्यानंतर ट्रम्प समर्थकांनी राजधानी परिसरात हिंसक निदर्शने करण्यास सुरुवात केली. ट्रम्प समर्थकांनी राजधानी परिसरातील जिन्यांच्या समोर सुरक्षेच्या दृष्टीने लावण्यात आलेले अवरोधक (बॅरिकेड्स) तोडून आत घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलीस आणि निदर्शकांमध्ये झटपट झाली.