मुंबईतील गिरणी कामगारांना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याचे नाना पटोले यांचे निर्देश


मुंबई : मुंबई शहरामध्ये जशी एसआरएच्या माध्यमातून घरे उपलब्ध करुन दिली जातात त्याचप्रमाणे गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच घरे तातडीने उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

मुंबईतील गिरणी कामगारांना तात्काळ घरे उपलब्ध करुन देण्याबाबत विधानभवन येथे बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस आमदार प्रकाश आबिटकर, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव (१) भूषण गगराणी, म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश म्हसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष बोबडे, कामगार विभागाचे सह सचिव स.मा. साठे, कामगार उपायुक्त गिरीश लोखंडे, गृहनिर्माण उपसचिव रा.को. धनावडे, अवर सचिव अरविंद शेठे, यासह गिरणी कामगार विभागाचे अध्यक्ष बी.के. आंब्रे, उदय भट, तसेच गिरणी कामगार उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, मुंबईतील गिरणी कामगारांच्या जमिनीसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली संनियंत्रण समिती स्थापन झालेली आहे. गिरणी कामगारासाठी सध्याला १ लाख ७४ हजार अर्ज म्हाडाकडे प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये काही दुबार नावे आली आहेत. त्या अर्जाची छाननी तातडीने करावी. तसेच गिरणी कामगारांना मुंबई शहरामध्येच जमीन उपलब्ध करुन त्याचे पुनर्वसन मुंबईतच करावे, असे निर्देशही नाना पटोले यांनी दिले. गिरणी कामगारांसाठी २००१ मध्ये शासनाने धोरण निश्चित केले असून या धोरणाची अंमलबजावणी तातडीने पूर्णत्वास न्यावी, असे निर्देशही नाना पटोले यांनी दिले.