हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर व्हाइट हाऊसमधील तीन महत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींनी एकाचवेळी दिले राजीनामे


वॉशिंग्टन – आज जे वॉशिंग्टन डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीमध्ये घडले, ते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या अनेक सहकाऱ्यांना पटलेले नाही. अमेरिकन लोकशाही व्यवस्थेला डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी केलेल्या हिंसाचारामुळे धक्का बसला आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मॅट पॉटिंगर, फर्स्ट लेडी मेलेनिया ट्रम्प यांच्या चीफ ऑफ स्टाफ स्टेफनी ग्रीशम आणि व्हाइट हाऊसचे उप प्रेस सचिव सारा मॅथ्यूज यांनी कॅपिटॉल इमारत परिसरातील घडामोडींनंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव पदाची जबाबदारी सुद्धा स्टेफनी ग्रीशम यांनी सांभाळली आहे. त्यांनी सर्व प्रथम राजीनामा दिला.

व्हाइट हाऊसमध्ये राहून देशसेवा करणे हा एक सन्मान होता. मेलेनिया ट्रम्प यांच्या लहान मुलांना मदत करण्याच्या मोहिमेचा मी एक भाग होते, याचा मला अभिमान असल्याचे ग्रीशम यांनी टि्वटरवर म्हटले आहे. मी आज जे कॅपिटॉल इमारतीमध्ये बघितले, ते पाहून अस्वस्थ झाले. माझ्या पदावरुन मी तात्काळ पायउतार होत आहे. आमच्या देशाला शांततेने सत्ता हस्तांतरणाची गरज असल्याचे सारा मॅथ्यूज यांनी म्हटले आहे.

भावी राष्ट्राध्यक्ष जो बायेडन यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करण्याची प्रक्रिया सुरु असतानाच ट्रम्प समर्थक मोठया संख्येने राजधानी वॉशिंग्टनमधील डीसीमीधील कॅपिटॉल इमारतीवर धडकले. अमेरिकन काँग्रेसचे कॅपिटॉल इमारतीमध्ये सभागृह आहे. येथे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीतील इलेक्टोरल मतांची मोजणी सुरु होती. बायडेन यांनी ट्रम्प यांच्यावर विजय मिळवल्याची घोषणा करण्यात येणार होती. हे सर्व या प्रक्रियेत बाधा आणण्याच्या हेतूने घडवण्यात आले. कॅपिटॉल इमारत परिसरात झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत चौघांचा मृत्यू झाला असून ५२ जणांना अटक करण्यात आली आहे.