बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याच्या अभिनयासोबतच त्याच्या अॅक्शन सीनची चाहत्यांमध्ये कायमच चर्चा रंगत असते. विशेष म्हणजे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला त्याचा असाच एक अॅक्शनपॅक चित्रपट येणार आहे. त्याच्या आगामी चित्रपटाचे नाव बच्चन पांडे असे असून या चित्रपटातील नुकताच त्याचा चित्रपटातील राऊडी लूक रिलीज करण्यात आला आहे.
यापूर्वी कधीही पाहिला नसेल असा असेल बच्चन पांडेमध्ये अक्षयचा लूक
आपल्या इन्स्टाग्रामवर बच्चन पांडेमधील आपल्या नव्या लूकमधील फोटो अक्षय कुमारने शेअर केला आहे. या लूकमध्ये अक्षय पूर्णपणे नव्या अंदाजात दिसत असून त्याचा हा लूक प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत आहे. अक्षयने शेअर केलेल्या फोटोमध्ये काळ्या रंगाचा कुर्ता आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. तसेच डोक्यावर लाल रंगाचा पंचा गुंडाळला आहे. बच्चन पांडेचे चित्रीकरण नव्या वर्षात सुरु. माझा हा साजिद नाडियादवालासोबत १० वा चित्रपट आहे. यापुढेदेखील त्याच्या चित्रपटात काम करत राहीन. मला तुमच्या शुभेच्छांची गरज आहे. मी कसा दिसतो ते सांगा, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले आहे.
दरम्यान, अक्षय कुमार बच्चन पांडे या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री क्रिती सेनॉन त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी ही कलाकारमंडळीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. फरहाद सामजी या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत.