विधानसभा अध्यक्षांचे निसर्ग चक्रीवादळातील बाधित मच्छिमारांना तातडीने मदत देण्याचे निर्देश


मुंबई : निसर्ग चक्रीवादळामध्ये रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्यांचे पंचनामे झाले आहेत. त्यांना तात्काळ आर्थिक मदत उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.

निसर्ग चक्रीवादळामध्ये रत्नागिरी व रायगड जिल्ह्यातील बाधित मच्छीमार बांधवांना आर्थिक मदत मिळण्याबाबत विधानभवन येथे बैठक झाली. बैठकीस आमदार रमेश पाटील, मत्स्य विकास विभागाचे आयुक्त अतुल पाटणे, रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी, महसूल उपायुक्त कोकण विभाग मकरंद देशमुख, मदत व पुनर्वसन विभागाचे उपसचिव सु.ह. उमराणी यासह मच्छीमार बांधवाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, चक्रीवादळामुळे रेवदंडा, हर्णे बंदर, या ठिकाणी बाधित मच्छीमार बांधवाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून ज्यांचे पंचनामे झाले आहेत. परंतु ज्यांना आर्थिक मदत मिळालेली नाही. अशा चक्रीवादळामुळे बाधित मच्छीमार बांधवांना मदत व पुनर्वसन विभागाकडून तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, असे निर्देशही नाना पटोले यांनी दिले.

रत्नागिरी जिल्ह्यातील मच्छीमार बांधवांच्या वाढीव नुकसानीबाबत 28 कोटींचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी युटीलायझेशन प्रमाणपत्र तातडीने द्यावे. शासनाने ठरविलेल्या वाढीव धोरणानुसार बाधित मच्छीमारांना लवकरात लवकर मदत उपलब्ध करुन देण्यात यावी, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.