नवी दिल्ली: सीरियातील घातक रासायनिक शस्त्र दहशतवाद्यांच्या हातात पडण्याच्या शक्यतेकडे भारताने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे लक्ष वेधले आहे. अस्थायी सदस्य म्हणून भारताने दोन वर्षांचा कार्यकाळ सुरू केल्यावर हे भारताचे पाहिले विधान आहे.
‘सीरियातील रासायनिक शस्त्रसाठा अतिरेक्यांच्या हातात पडण्याचा धोका’
संयुक्त राष्ट्रातील भारताचे दूत टी.एस. तिरुमूर्ती म्हणाले की, रासायनिक शस्त्रे दहशतवादी संघटना आणि व्यक्तींच्या हाती पडण्याची शक्यता असल्याने भारत चिंता व्यक्त करत आहे. सीरियामध्ये दशकभरापासून सुरू असलेल्या संघर्षाचा गैरफायदा घेऊन दहशतवादी गटांनी या संपूर्ण विभागामध्ये आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. दहशतवादविरोधी लढाईत ढिलाई करणे किंवा दहशतवाद्यांना मोकळे रान मिळू देणे हे जगाला परवडणारे नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.
सुरक्षा परिषदेने सीरियन रासायनिक शस्त्र उत्पादन आणि वापर करण्याला आळा घालण्याच्या दृष्टीने कार्यकारी समितीच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याबाबत ‘ऑर्गनायझेशन फॉर द प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स (ओपीसीडब्ल्यू)’ च्या कामकाजाचा आढावा सुरक्षा परिषदेने घेतला. यावेळी तिरुमूर्ती यांनी रासायनिक शस्त्रास्त्रांविषयीच्या भारताच्या धोरणावर प्रकाश टाकला.
कोणत्याही वेळी, कोणीही आणि कुठल्याही परिस्थितीत रासायनिक शस्त्रे वापरण्यास भारताचा ठाम विरोध आहे. आम्ही रासायनिक शस्त्रांच्या वापराचा तीव्र निषेध करतो. कोणत्याही परिस्थितीत रासायनिक शस्त्रांच्या वापराचे समर्थन करता येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. सीरियामधील रासायनिक साठा आणि त्यासंबंधित सुविधा नष्ट करण्यासाठी भारताने ओपीसीडब्ल्यू ट्रस्ट फंडात भरीव योगदान दिले आहे.