गरीब वस्त्यांतील महिलांचे प्रश्न प्राधान्याने सोडवावेत – मेधा पाटकर यांची मागणी


मुंबई : गरीब वस्त्यांतील महिलांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी महिला व बालविकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची भेट घेतली. सर्वंकष महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून श्रीमती पाटकर यांनी मांडलेल्या मागण्यांबाबतही सकारात्मक कार्यवाही केली जाईल, असे ॲड. ठाकूर यांनी यावेळी सांगितले.

मुंबईतील गरीब वस्त्यांमधील महिलांच्या प्रश्नांच्या अनुषंगाने श्रीमती पाटकर यांनी शिष्टमंडळासह मंत्री ॲड. ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी महिला व बालविकास विभागाच्या सचिव श्रीमती इद्झेस कुंदन, माविमच्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती श्रद्धा जोशी- शर्मा उपस्थित होत्या.

ॲड. ठाकूर म्हणाल्या, विविध विभागांबरोबर अभिसरणाच्या माध्यमातून महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. सुमारे 520 कोटी रुपये खर्चाचा ‘नव तेजस्वीनी महाराष्ट्र ग्रामीण महिला उद्यम प्रकल्प’ राबविण्यास मान्यता देण्यात आली असून ग्रामीण महिलांमध्ये उद्यमशीलतेचा विकास, त्यांना लघुउद्योग उभारणीसाठी मदत आदी महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत. यापूर्वीच्या महिला धोरणात असलेल्या त्रुटी काढून सर्वंकष महिला धोरण तयार करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. त्यामध्ये विविध विभागांकडील पायाभूत प्रकल्प, सेवा, सुविधांच्या आखणी प्रसंगी महिलां केंद्रीततेचाही विचार व्हावा अशी तरतूद त्यात केली जाईल. त्याचा आढावा घेतला जाईल, असे ॲड.ठाकूर यांनी सांगितले.

यावेळी श्रीमती पाटकर यांनी विविध मागण्या मांडल्या. गरीब वस्त्यांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना मूलभूत सोयीसुविधा मिळणे आवश्यक आहे. तेथे पिण्याच्या पाण्यासाठी नळजोड, शौचालयाची व्यवस्था होणे, या बाबी महिलांचे दैनंदिन जीवन सुसह्य आणि सुरक्षिततेच्याही दृष्टीने आवश्यक आहे. झोपडपट्टी पुनर्वसनच्या योजनांमध्ये तेथे राहणाऱ्या, विधवा, एकट्या राहणाऱ्या महिलांना घरे मिळतील याकडे विशेष लक्ष दिले जावे; नागरी विकास योजनांतर्गत प्रकल्पांच्या आखणीमध्ये महिलांकेंद्रीत दृष्टीकोन लक्षात घ्यावा. तसेच नागरी क्षेत्रात गरीब महिलांना आरोग्याच्या सुविधा प्रभावीपणे मिळाव्यात, सार्वजनिक पुरवठा अंतर्गत रेशनचे धान्य सुलभ प्रक्रियेद्वारे मिळावे आदी अपेक्षा श्रीमती पाटकर यांनी व्यक्त केल्या.