भारतीय कामगारांना मिळणार जपानमध्ये रोजगाराच्या संधी


नवी दिल्ली: केंद्रीय मंत्रिमंडळाने भारत आणि जपान यांच्यात कामगारांच्या संदर्भात सामंजस्य करार (एमओसी) करण्यास मान्यता देण्यात आली. या करारामुळे जपानमधील १४ क्षेत्रात भारतीय कुशल कर्मचाऱ्यांना रोजगाराच्या संधी मिळणार आहेत.

या करारानुसार परिचारिका, इमारतींची साफसफाई, धातू प्रक्रिया उद्योग, औद्योगिक मशिनरी उत्पादन, इलेक्ट्रिक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे, बांधकाम, जहाज बांधणी व जहाजांशी संबंधित उद्योग, वाहनांची देखभाल यासारख्या क्षेत्रात भारतीय कामगारांना संधी मिळणार आहे. त्याचप्रमाणे हवाई वाहतूक, तात्पुरती घरे उभारणी, शेती, मत्स्यव्यवसाय, खाद्य व पेय उत्पादन उद्योग, खानपान सेवा उद्योग यासारख्या क्षेत्रातही संधी दिली जाईल.

जपानमध्ये काम करू इच्छिणाऱ्या कर्मचाऱ्यांना भाषेचे जुजबी शिक्षण घेणे अनिवार्य आहे. त्याचप्रमाणे जपानमध्ये त्यांना त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील उपलब्ध तंत्रज्ञान आणि कार्यपद्धती यांचेही प्रशिक्षण दिले जाईल.

या कराराची अंमलबजावणी करण्यासाठी दोन्ही देशांची एक संयुक्त संस्थात्मक यंत्रणा उभारण्यात येणार आहे. या करारामुळे भारत आणि जपानमधील नागरिकांमध्ये सुसंवाद वाढण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे दोन्ही देशातील कुशल कामगार आणि व्यावसायिकांना कौशल्य आणि तंत्रज्ञानाचे आदानप्रदान होण्यास चालना मिळेल.