लंडन: ब्रिटनमध्ये नव्या कोरोना विषाणूने थैमान घातल्यामुळे निर्माण झालेल्या आणीबाणीच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आपला भारत दौरा रद्द केला आहे. प्रजासत्ताक दिनाच्या विशेष कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जॉन्सन उपस्थित राहणार होते.
ब्रिटीश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा भारत दौरा रद्द
ब्रिटीश पंतप्रधानांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून भारतभेटीवर येऊ शकत नसल्याबद्दलखंत व्यक्त केली. भारत आणि ब्रिटनमधील सहकार्य कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.
ब्रिटनमधील नव्या कोरोना विषाणूच्या प्रसाराचा वेग आणि त्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेले लॉकडाऊन यामुळे पंतप्रधानांनी देशातच असणे अधिक संयुक्तिक असल्याने त्यांचा भारत दौरा रद्द करण्यात आल्याचे डाऊनिंग स्ट्रीटच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले.
दोन्ही देशांमधील संबंध अधिक दृश्य करण्याबाबत आणि कोरोना महसूल तोंड देण्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना याबाबत दोन्ही देशांच्या पंतप्रधानांमध्ये चर्चा झाल्याचेही ब्रिटनच्या पंतप्रधान कार्यालयाने सांगितले. जॉन्सन या वर्षाच्या जी-७ राष्ट्रांच्या बैठकीपूर्वी या वर्षीच्या पहिल्या सहामाहित भारताला भेट देऊ शकतात, असेही सांगण्यात आले.