सामाजिक न्यायमंत्र्यांचे संत रोहिदास भवनाच्या बांधकामास गती देण्याचे निर्देश


मुंबई : रोहिदास समाज पंचायत संघ, परळ मुंबई या संस्थेच्या संत रोहिदास भवनचे बांधकाम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बंद होते त्या बांधकामास आता गती देण्याचे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे संत रोहिदास भवन परळ मुंबई येथील बांधकामांचा आढावा बैठक झाली त्यावेळी धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी आमदार मंगेश कुडाळकर, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव श्याम तागडे, समाजकल्याण आयुक्त प्रशांत नारनवरे व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

यावेळी धनंजय मुंडे म्हणाले, परळ येथील संत रोहिदास भवनाच्या बांधकामास सुरुवात झाली होती परंतु लॉकडाऊनमुळे हे बांधकाम थांबले होते आता डी. सी. पी.आर. 2034 अंतर्गत सदर प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. तसेच आता बांधकामास आवश्यक त्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत. निधीही देण्यात आला आहे. त्यामुळे या बांधकामास गती देऊन संत रोहिदास भवनचे बांधकाम लवकर पूर्ण करावे तसेच या बांधकामास अजून काही निधी लागला तर तो देण्यात येईल असे धनंजय मुंडे यावेळी म्हणाले.