नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक राष्ट्र निर्माणाचा पाया – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री


मुंबई : नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक हे राष्ट्र निर्माणाचा पाया आहेत, असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सांगितले. राज्यस्तरीय युवा संसद कार्यक्रमाचे उद्घाटन उदय सामंत यांच्या हस्ते झाले.

संसदेच्या केंद्रीय सभागृहात दि. १२ जानेवारी, २०२१ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय युवा संसदेच्या पार्श्वभूमीवर राज्यपातळीवरील स्पर्धा नेहरू युवा केंद्र, पुणे आणि राष्ट्रीय सेवा योजना, क्षेत्रीय कार्यालय पुणे यांच्यावतीने गोखले इंस्टीट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकोनॉमिक्स, पुणे येथे आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमासाठी उदय सामंत हे दूरदृश्य प्रणालीद्वारे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते.

उदय सामंत म्हणाले, माझ्या सामाजिक व राजकीय प्रवासाच्या सुरूवातीला नेहरू युवा केंद्र युवा मंडळाच्या माध्यमातून कामे केलेली आहेत. केंद्राच्या अनेक उपक्रमात मी सहभागी होतो. या माध्यमातून केलेल्या कामांच्या आठवणींना आज उजाळा देत असताना मनस्वी आनंद होत आहे. कोरोना काळात नेहरू युवा केंद्र आणि राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी अत्यंत महत्त्वपूर्ण असे योगदान दिलेले आहे. या राज्यस्तरीय स्पर्धेतून विजयी झालेले स्पर्धक राष्ट्रीय स्तरावरही आपल्या राज्याचे नाव उज्ज्वल करतील असा मला विश्वास आहे. भारत हा तरुणांचा देश आहे. ज्या क्षेत्रात काम करायचे आहे तिथे प्रामाणिकपणे प्रयत्न केले तर यश नक्की मिळते. सकारात्मक रहात सातत्यपूर्ण प्रयत्न केले तर सर्वकाही शक्य आहे, असेही उदय सामंतयांनी यावेळी सांगितले.

यावेळी झालेल्या राज्यस्तरीय स्पर्धेत आयाती पिनाक मिश्रा, प्रतीक रमेशराव ठाकरे आणि सलोनी संजय त्रिवेदी या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकाविला. दि.१२ जानेवारी २०२१ रोजी संसदेच्या केंद्रीय सभागृहात राष्ट्रीय युवा संसद पार पडणार आहे. या स्पर्धेत सर्व राज्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने निवड झालेल्या स्पर्धकांना सहभागाची संधी मिळणार आहे. तसेच प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाने विजयी होणाऱ्या स्पर्धकांना अनुक्रमे दोन लाख, दीड लाख आणि एक लाख असे बक्षीस देण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र संघटनेचे राज्य संचालक प्रल्हाद सोनुने, राष्ट्रीय सेवा योजनेचे क्षेत्रीय संचालक डी. कार्तिकेयन, पुणे जिल्हा युवा अधिकारी यशवंत मानखेडकर, राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी विनीत मालपुरे, गोखले इन्स्टिट्यूट ऑफ पॉलिटिक्स अँड इकॉनॉमिक्सचे कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय युवा स्वयंसेवक वैभव अनिल अलई यांनी राज्यस्तरीय युवा संसद यशस्वी करण्यासाठी विशेष प्रयत्न केले.