नवीन ऑफिसवरून डिवचणाऱ्या कंगनाला उर्मिला यांचे खुले आव्हान


मागील काही महिन्यांपासून अभिनेत्री कंगना राणावत सतत विविध कारणांमुळे चर्चेत आहे. तिने यावेळी पुन्हा एकदा अभिनेत्री आणि शिवसेना नेत्या उर्मिला मातोंडकर यांना लक्ष्य केले. उर्मिलाने घेतलेल्या नवीन ऑफिसवरून कंगना राणावतने टिकास्त्र सोडल्यानंतर उर्मिलानेही आता कंगनाला थेट आव्हान दिलं आहे. जागा आणि वेळ तुम्ही सांगा, फ्लॅट आणि ऑफिसचे डॉक्युमेंट्स घेऊन मी हजर होते. त्याबदल्यात फक्त ड्रग्ज घेणा-यांची ती यादी तुम्ही द्या, अशा शब्दांत उर्मिला यांनी कंगनाला आव्हान दिले आहे.

अलिकडेच मुंबईत नवीन कार्यालय उर्मिला मातोंडकर यांनी खरेदी केले. कंगना राणावतने त्यावरुन एवढ्या मेहनतीने मी घर बांधले तेही काँग्रेसने तोडले. खरच लोक म्हणतात तसे भाजपला साथ देऊन तर माझ्या हाती काय लागले… तर 20-25 कोर्ट केसेस. मी तुमच्याप्रमाणे समजदार नाही ना, नाहीतर मी पण काँग्रेसचा हात पकडला असता. किती मूर्ख आहे मी…असे ट्विट करत उर्मिलाला लक्ष्य केले होते.


उर्मिला यांनी त्यावर प्रत्युत्तर देताना ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला आहे. गणपती बाप्पा मोरया या कॅप्शनसह पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, नमस्कार कंगनाजी…माझ्याबद्दलचे तुमचे जे उच्च विचार आहेत ते मी ऐकले आहेत. मीच काय तर पूर्ण देशाने ते विचार ऐकले आहेत. पूर्ण देशासमोर आज मी तुम्हाला सांगू इच्छिते, जागा आणि वेळ तुम्ही ठरवा…मी माझे सगळे कागदपत्र तेथे घेऊन येते…मी केलेला हा सर्व व्यवहार राजकारणात येण्याआधी केला होता. याचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत. तुम्ही फक्त एक काम करा, एनसीबीला तुम्ही जी यादी देणार होतात, ती द्या. तुमच्याकडे अशा कोणत्या लोकांची नावे आहेत याची माहिती मलाच काय पण देशाला जाणून घेण्याची उत्सुकता आहे…तुमच्या उत्तराची वाट बघते.. तोपर्यंत…जय हिंद…जय महाराष्ट्र आणि गणपती बाप्पा मोरया, असे आव्हान उर्मिला यांनी कंगनाला दिलं आहे.