शिवसेने का भगवा अब हरा हो गया है; किरीट सोमय्यांची जळजळीत टीका


मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या औरंगाबाद शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन यांनी शिवसेनेवर बोचऱ्या शब्दांत वार केला असून शिवसेनेचा भगवा आता हिरवा झाला असल्याची जळजळीत टीका त्यांनी केली आहे.


सोमवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी ते बोलत होते. संभाजीनगर या नावाला काँग्रेस पक्षानंतर समाजवादी पक्षानेही विरोध केला आहे. तेव्हा आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना हिंदूहृदयसम्राटांना मानते की नाही, हे पाहायची वेळ आली आहे. त्यांचा भगवा हिरवा झाला आहे का, याचे उत्तर शिवसेनेने द्यावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले.

सध्या राज्यात औरंगाबाद महानगरपालिकेची निवडणूक जवळ येऊन ठेपल्याने शहराच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन वाद सुरु आहे. हा मुद्दा भाजपने लावून धरला असून शिवसेनेची त्या माध्यमातून कोंडी केली जात आहे. शिवसेनेची पूर्वीपासूनची औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर करण्यात यावे, ही मागणी आहे. पण आता काँग्रेससोबत सत्तेत बसल्यामुळे शिवसेनेची अडचण झाली आहे. तर औरंगाबादच्या नामांतराला आपला विरोध असल्याचे काँग्रेसने स्पष्ट केले आहे.