आता या माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणार रोहित शेट्टी


आतापर्यंत दिग्दर्शक रोहित शेट्टीने सिंबा, गोलमाल, चेन्नई एक्स्प्रेस, ऑल दी बेस्ट, सिंघम रिटर्नस् अशा अनेक अ‍ॅक्शन आणि कॉमेडीचा तडका असलेल्या चित्रपटातून आपले मनोरंजन केले आहे. त्यातच आता एक नवे माध्यम रोहित शेट्टीला खुणावत असून रोहित शेट्टी लवकरच ओटीटी विश्वात पदार्पण करणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार, लवकरच 8 भागांची एक अ‍ॅक्शन, थ्रिलर वेब सीरिज रोहित शेट्टी बनवणार आहे. सत्य घटनेवर प्रेरित ही वेबसिरीज असेल. अद्याप या वेबसिरीजचे नाव निश्चित झालेले नाही. रोहित शेट्टी सध्या रणवीर सिंगसोबत एका चित्रपटाचे काम करत आहे. शेक्सपिअरच्या ‘द कॉमेडी ऑफ फिअर्स’ या नाटकावरुन या चित्रपटाचा विषय घेण्यात आला असून या चित्रपटाचे ‘सर्कस’ असे नाव आहे.

हा चित्रपट विनोदी असेल. रोहित शेट्टीने लॉकडाऊनमध्ये मिळालेल्या मोकळ्या वेळात स्क्रिप्टवर काम केले आहे. रणवीर सिंगसोबत या चित्रपटाची कल्पना रोहित शेट्टीने शेअर केली, तेव्हापासून रणवीर सिंगदेखील या चित्रपटात काम करण्यासाठी खूप उत्साही आहे. मीडिया रिपोर्टनुसार रणवीर सिंग या चित्रपटात प्रथमच डबल रोल साकारणार आहे. रणवीर सिंग व्यतिरिक्त वरुण शर्मा, पूजा हेगडे आणि जॅकलिन फर्नांडिससुद्धा महत्त्वपूर्ण भूमिकेत असतील. सर्कस चित्रपटाचे काम पूर्ण झाल्यानंतर तो वेबसिरीजच्या तयारीला लागणार आहे. आता या नव्या चॅलेंजमध्ये तो किती यशस्वी होतो हे येणाऱ्या काळात समजेलच.