राज्यात चारही जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा ड्राय रन यशस्वी


मुंबई : कोरोना लसीकरणासाठी राज्यातील पुणे, नागपूर, जालना आणि नंदूरबार या चार जिल्ह्यांमध्ये ड्राय रन यशस्वीरित्या घेण्यात आला. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते जालना येथे ड्राय रनच्या सत्राचे उद्घाटन करण्यात आले. प्रत्येक जिल्ह्यात तीन ठिकाणी लसीकरणाचे ड्राय रन घेण्यात आले. राज्यस्तरावरुन या ड्राय रनचे संनियंत्रण आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास, आयुक्त डॉ. रामास्वामी, संचालक डॉ अर्चना पाटील यांनी केले.

पुणे जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय औंध, प्राथमिक आरोग्य केंद्र माण, पिंपरी चिंचवड महापालिकेतील जिजामाता आरोग्य केंद्र, नंदूरबार जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालय नंदूरबार, प्राथमिक आरोग्य केंद्र आष्टी आणि उपजिल्हा रुग्णालय नवापूर तर जालना जिल्ह्यात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय अंबड, प्राथमिक आरोग्य केंद्र शेळगाव, नागपूर जिल्ह्यात डागा मेमोरियल हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय कामठी आणि नागपूर महापालिकेतील के.टी.नगरचे शहरी आरोग्य केंद्र याठिकाणी ड्राय रन घेण्यात आला. या चारही जिल्ह्यांमध्ये व महानगरपालिकेत सत्र स्थळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक व मनपा आरोग्य अधिकारी यांनी भेटी देऊन संनियंत्रण केले.

या ड्राय रनमध्ये सत्र स्थळावर चाचणी लाभार्थ्यांचे निरीक्षण करणे. २५ लाभार्थ्यांचे लसीकरण करणे याकामांसोबतच लसीकरण अधिकारी एक यांनी लाभार्थ्यांना त्यांच्या कोवीन अॅपवरील नोंदणीनुसार कक्षात सोडले. त्यानंतर लसीकरण अधिकारी दोन यांनी कोवीन अॅप्लीकेशनमध्ये लाभार्थ्यांच्या माहितीची पडताळणी केली. त्यानंतर लसीकरणाची माहितीची नोंद कोवीन ॲपमध्ये करण्यात आली. गर्दीचे व्यवस्थापन, लाभार्थ्यांशी वैयक्तिक संवाद साधणे, आरोग्य सेविकेला मदत करणे, लसीकरण झाल्यानंतर ३० मिनिटे लाभार्थ्यांना थांबण्यास सांगणे इ. गोष्टी लसीकरण अधिकारी तीन व चार यांनी केले.

कोरोना लसीकरण सत्र आयोजित करताना हात धुण्याची व्यवस्था, सॅनिटायझरची उपलब्धता करण्यात आली. सर्वांनी मास्क वापरणे आणि योग्य ते अंतर (Social Distancing) राखणे या नियमांची अंमजबजावणी करण्यात आली. सर्व सत्रांच्या ठिकाणी लसीचे दुष्परिणामांवरील उपचाराचे औषधाचे साहित्य ठेवण्यात आली होती.

ड्राय रनचे उद्दिष्ट

  • क्षेत्रियस्तरावर कोवीन अॅप किती सोईस्कर व उपयोगी आहे हे तपासणे.
  • कोरोना लसीकरणाबतचे नियोजन, अंमलबजावणी तसेच अहवाल तयार करणे, या सर्व बाबींची पडताळणी/ तपासणी.
  • प्रत्यक्ष लसीकरण सुरु करण्यापूर्वी, लसीकरणाबाबतची आव्हाने व त्यानुसार मार्गदर्शक सुचना तयार करणे
  • लसीकरण मोहिमेतील सर्वस्तरावरील अधिकारी तसेच कर्मचारी यांचा आत्मविश्वास वाढविणे.