औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्यावरून प्रवीण दरेकरांनी साधला शिवसेनेवर निशाणा


मुंबई – राज्य सरकारच्या अखत्यारितील औरंगाबादचे संभाजीनगर नामकरण करण्याचा निर्णय विषय असल्यामुळे उठसूट कोणतीही गोष्ट केंद्र सरकारवर ढकलणे राज्य सरकारने बंद केले पाहिजे, असे म्हणत महाविकासआघाडी सरकारवर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी निशाणा साधला आहे.

तसेच, महापालिकेचा प्रस्ताव, राज्य सरकारची मंजुरी आणि मग केंद्राची मान्यता अशी प्रक्रिया कुठल्याही शहराचे नामकरण करण्यासाठी आहे. संभाजीनगर असे औरंगाबादचे नामकरण करायचे असेल, तर महापालिका तुमची आहे, तिथे ठराव करा, राज्याच्या कॅबिनेटला निर्णय द्या, असे देखील दरेकर यांनी सांगितले आहे.

प्रवीण दरेकर यांना माध्यमांनी याच पार्श्वभूमीवर विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना म्हटले की, राज्य सरकारचा एकही विषय, एकही दिवस, एकही सेकंद केंद्राशिवाय जात नाही. कुठलीही गोष्ट आली की केंद्राकडे बोट दाखवयचे, मग तुम्ही कशाला राज्य सरकार चालवता? तुम्ही केंद्राला महाकाली लेणी संदर्भात निर्णय घेताना विचारले होतं का? आमच्या अस्मितेसंदर्भात कुठलाही विषय केंद्राकडे अडकणार नाही. आम्ही त्याच्या पाठीशी असू. पण नाचता येईना अंगण वाकडे अशी यांची अवस्था झाली आहे.

नामांतराच्या मुद्यावर काँग्रेसने घेतलेल्या भूमिकेबद्दल बोलताना दरेकर शिवसेनेला उद्देशून म्हणाले, आता बाळासाहेब थोरात यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया द्यावी. काही झाले तरी चालेल, प्रसंगी सत्ता सोडू पण संभाजीनगर नामकरण करूच असे म्हणत होते, आता आहे का हिंमत? त्यांना आता सत्ता जास्त महत्वाची असल्यामुळे केंद्राकडे बोट दाखवून जनतेची फारकाळ फसवणूक करता येणार नाही.

अगोदर कॅबिनेटचा तुम्ही निर्णय घ्या आणि महाराष्ट्र सरकार म्हणून शिफारस करा. केंद्राला आम्ही सांगू की याला मदत करा. पण काही करायचे नाही आणि केंद्राकडे बोट दाखवायचे, अशाप्रकारची त्यांची एक ठरलेली रणनीती आहे. परंतु हे न समजण्या एवढी महाराष्ट्रातील जनता दुधखुळी नसल्याचे देखील दरेकरांनी यावेळी बोलून दाखवले.